मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळेंची आयुक्त तुकाराम मुंढे व महापौरांकडे लेखी मागणी
नवी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नवी मुंबईचा ऐतिहासिक संबंध लक्षात घेऊन बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवी मुंबई महापालिका सभागृहात लावण्यात यावे अशी मागणी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर सुधाकर सोनावणे यांना पत्र पाठवून केली आहे. हे तैलचित्र लावण्याची परवानगी दिल्यास महाराष्ट्रातील अग्रगण्य चित्रकारांकडून मनसे हे तैलचित्र स्वखर्चाने बनवून महापालिकेला भेट देईल, जेणेकरून मनपाच्या तिजोरीवर खर्चाचा भार पडणार नाही असे मनसेने आयुक्तांना व महापौरांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी तसेच स्वाभिमानासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले त्या दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवी मुंबई मनपा सभागृहात असणे ही बाळासाहेबांना नवी मुंबईकरांकडून एक वेगळी आदरांजली ठरेल असे मत मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केले आहे.
बाळासाहेब व नवी मुंबईचे अतूट व जिव्हाळ्याचे नाते आहे. नवी मुंबई वाशी येथील मनपा संदर्भ रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच तमाम मराठी नाट्य रसिक प्रेमींसाठी सुरु केलेले विष्णुदास भावे नाट्यगृहाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या हस्ते झाले होते. इतकेच नाहीतर आदरणीय बाळासाहेबांनीच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सांगून नवी मुंबईतील तब्बल 103 दगडखाणी बंद करण्यास सरकारला भाग पाडले होते. बाळासाहेबांच्या या एका निर्णयामुळे नवी मुंबई परिसरातील लाखो नागरिकांची असहाय्य प्रदूषणातून सुटका झाली असल्याचा उल्लेख ही मनसेने पत्रात केला असल्याचे गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
तसेच या संदर्भात नवी मुंबईतील सर्व पक्ष प्रमुखांना या मागणीचे पत्र पाठवण्यात येईल व मनपा सभागृहातील सर्वच सन्माननीय नगरसेवकांनाही पत्र पाठवून या मागणीला पाठींबा देण्याचे आवाहन मनसे कडून करण्यात येणार असल्याचेही गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.