मुंबई : प्राप्तिकर भरण्याचा सोमवार (ता. 31) शेवटचा दिवस असून ई-रिटर्न दाखल करणे सुलभ होण्यासाठी प्राप्तिकर खात्याकडून विवरणपत्रांचे (आयटीआर-व्ही) ई-व्हेरीफिकेशन केले जाईल. या सेवेमुळे पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणार्या करदात्यांच्या मोठ्या गटाला फायदा होईल, वेळेची बचत होईल आणि परतावाही जलद मिळेल.
डिजिटल सिग्नेचरअभावी गेल्या वर्षापर्यंत करदात्यांना विवरणपत्राची एक प्रत स्वाक्षरीसह बेंगळूरुच्या मध्यवर्ती केंद्राकडे पाठवणे बंधनकारक होते. कित्येकदा हे पत्र प्राप्तिकर खात्याला मिळायचे नाही. त्याचा मनस्ताप करदात्यांना सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून यंदा आयटीआर-व्हीच्या ई-पडताळणीची सुविधा प्राप्तिकर खात्याने दिली आहे. ई-रिटर्न दाखल केल्यानंतर ई-व्हेरीफिकेशनचा पर्याय निवडता येईल. आतापर्यंत 12 लाख करदात्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती प्राप्तिकर खात्याने दिली आहे. या सेवेचा अनिवासी भारतीय करदात्यांना लाभ होईल.
** सुलभ पर्याय
* ईव्हीसी : ई-रिटर्न दाखल करताना आधार, नेट बँकिंग, ई-मेल आणि मोबाईल अशा माध्यमांतून 10 आकडी ईव्हीसी (अल्फा न्युमेरिक ई-व्हेरीफिकेशन कोड) निर्माण करता येईल. प्रत्येक पॅनसाठी स्वतंत्र ईव्हीसी असेल. हा कोड एका रिटर्नसाठीच वापरता येतो. त्यामुळे दुसरे विवरणपत्र दाखल करायचे असल्यास पुन्हा कोड निर्माण करावा लागेल.
* आधार : करदात्याला आधार कार्डवर नोंदणीकृत असलेला मोबाईल क्रमांक ई-रिटर्नमध्ये द्यावा लागेल. त्यासाठी आयटीआर-व्हीमध्ये रकाना दिला आहे. आधार कार्ड प्राप्तिकर खात्याशी संलग्न झाल्यानंतर काही मिनिटांतच मोबाईलवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) येईल. तो पासवर्ड दिल्यावर आयटीआर-व्ही स्वीकारले जाईल. या प्रक्रियेला 10 मिनिटे लागतात.
* नेट बँकिंग : पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न किंवा करपरतावा असणार्या करदात्यांना केवळ नेट बँकिंगच्या माध्यमातून ईव्हीसी निर्माण करावा लागेल. बहुतांश बँका ही सेवा देतात. मोबाईलवर ईव्हीसी पाठवला जातो.
* एटीएम : काही बँकांनी एटीएम मशीनमध्ये ईव्हीसी निर्माण करण्याची सुविधा दिली आहे. करदात्यांना डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा वापर करून ईव्हीसी निर्माण करता येईल.