महाड : महाडमध्ये व्यवसाय शिक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका बजावणार्या या औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि शासकीय तांत्रिक विद्यालयाची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण इमारत गळत असल्याने पावसात वीज उपकरणांमधील वीज प्रवाहामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचेही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. संपूर्ण इमारत परिसरात अस्वच्छता आहे. याबाबत गेली पाच वर्ष पत्रव्यवहार सुरू असूनही संबंधित विभाग आणि सरकारचेही या दुरवस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे.
दहावी-बारावीनंतर अनेक जण व्यवसायिक शिक्षणाकडे वळतात. याकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने आय.टी.आय.ची निर्मिती झाली आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि शासकीय तांत्रिक विद्यालय यामधून व्यवसायिक शिक्षण घेतल्यानंतर रोजगार तसेच स्वयंव्यवसायाची संधी प्राप्त करता येते. यामुळे आयटीआय आणि व्यवसायावर आधारित शिक्षण देणार्या संस्थांची मागणी वाढली आहे. महाड आय.टी.आय.ने आपला शैक्षणिक दर्जा कायम राखला आहे. गेल्या अनेक वर्षात महाड आय.टी.आय.मधून महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा आदी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी व्यवसायिक शिक्षण घेऊन रोजगार निर्माण केला आहे. मात्र केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे महाड आय.टी.आय.च्या नवीन इमारतीला गळती लागली आहे. इमारतीचे पत्रे तुटल्याने ही गळती लागली असून वर्गात पाणी साचते. भिंती ओल्याच असल्याने वीज उपकरणातून प्रवाहित असलेल्या विजेमुळे विद्यार्थ्यांना धोका आहे. तसेच इमारतीमध्ये तसेच परिसरात स्वच्छता नाही. विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झाली आहे. साफसफाई नसल्याने विद्यार्थ्यांना नाक मुठीत धरून शिकावे लागत आहे. महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत आणि शासकीय तांत्रिक विद्यालय लागूनच आहे. या दोन्ही इमारतींचे प्रवेशद्वार गवताने झाकले गेले आहेत. शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या समोरच पडलेले झाड देखील उचलले गेलेले नाही. २००९ मध्ये मंजूर झालेली या नवीन इमारतीचा पहिला मजला २०१२ मध्ये पूर्ण झाला असून इमारतीमध्ये अनेक त्रुटी राहिल्याने इमारतीची दुरवस्था झाली आहे. महाडमधील शासकीय तांत्रिक विद्यालयात इयत्ता ९वी ते १२वीपर्यंत सुमारे ३०० तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत किमान ५०० विद्यार्थी व्यवसायिक शिक्षण घेत आहेत.
शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये इलेक्ट्रिक, मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशिअन, ऍटो इंजिन मॅकेनिक, मेन्टनन्स ऍन्ड रिपेअर डॉमेस्टिक ऍम्लायन्सेस अशा प्रकारचे किमान कौशल्यावर आधारित व्यवसायिक शिक्षण दिले जाते. तर महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ए.ओ.सी.पी., एम.एम.सी.पी., आय.एम.सी.पी, इलेक्ट्रिशिअन, वायरमन, फिटर, टर्नर, मोटर मॅकेनिक, वेल्डर या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या इमारतीच्या दुरवस्थेबाबत महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून कायम पाठपुरावा करण्यात आला आहे. येथील प्राचार्य जी. जे. शिवलकर यांनी याबाबत माहिती देताना सन २०११पासून सार्वजनिक बांधकाम विभाकडे केलेला पाठपुराव्याचा पत्रव्यवहार समोर मांडला. यामध्ये इमारतीवर टाकलेले सिमेंटचे पत्रे तुटले आहेत. यामुळे पावसाचे पाणी वर्गात साचते. वर्ष २०१३पासून सात वेळेस इमारतीच्या दुरवस्थेबाबत पत्रव्यवहार करण्यात आले आहेत.
इमारतीची संपूर्ण वायरींग देखील नादुरुस्त झाल्याने वायरींग बदलून मिळावी याकरिता देखील पत्र देण्यात आले आहे. मात्र यातील एकाही पत्राची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेली नाही. नवीन इमारतीला खिडक्यांना जाळ्या बसवून देण्याची मागणी केली, मात्र तीदेखील पूर्ण न झाल्याने अखेर प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून वेल्डर विभागाच्या विद्यार्थ्यांनीच खिडक्यांच्या जाळ्या बनवून घेतल्या आणि त्या बसवण्यात आल्या आहेत.
महाड औद्योगीक प्रशिक्षण संस्था ज्याठिकाणी आहे त्याच्या एका बाजूला नागरी वस्ती तर एका बाजूला मोकळे मैदान आहे. यामुळे येथे खेळावयास येणार्या मुलांकडून दगड मारण्याचे प्रकार केले जातात. यामुळे इमारतीच्या एका बाजूचे पत्रे आणि खिडक्या अधिक प्रमाणात तुटल्या आहेत. मोकळ्या मैदानात रात्रीच्या सुमारास दारू पिणारे देखील खुशाल येऊन बसत असल्याचे सांगण्यात आले.
महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा शैक्षणिक दर्जा उत्तम असल्याने याठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कायम वाढती राहिली आहे. असे असूनही शासनाच्या दुर्लक्षामुळे गेली अनेक र्वष याठिकाणी अनेक पदे रिक्त ठेवली गेली आहेत. महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध विभागातील एकूण ५४ पदे मंजूर आहेत. मात्र यामध्ये १३ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये निर्देशकांची सहा पदे रिक्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शासकीय तांत्रिक विद्यालयाची तीच अवस्था असून याठिकाणी देखील तब्बल ११ पदे रिक्त असल्याची माहिती आहे.