नवी मुंबई : सार्वजनिक उत्सवांकडे नागरिकांनी तसेच आयोजकांनी फक्त मनोरंजन म्हणून न बघता ते सुरू करण्यामागील देशभक्तांच्या भूमिकेचा आदर करावा, असे आवाहनही पोलीस आयुक्त श्री. रंजन यांनी केले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने परिमंडळ-१ अंतर्गत दहीहंडी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि शांतता समितीच्या सदस्यांची बैठक तसेच गतवर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१४ यामधील पोलीस ठाणे निहाय विजेत्या मंडळांना पारितोषिक वितरण समारंभ सोमवार , दि. ३१ ऑगस्ट रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित सार्वजनिक गणेशात्सवाचे पदाधिकारी-कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त श्री. रंजन बोलत होते.
सध्याचे सार्वजनिक उत्सव इवेन्ट बनले असून त्याचे दुष्परिणाम समाजालाच भोगावे लागत असल्याची बाब हेरुन मुंबई उच्च न्यायालयाने सर्वच सार्वजनिक उत्सव कायद्याच्या कक्षेत आणि शांततापूर्ण वातावरणात साजरे होण्यासाठी सर्व मंडळांसाठी आदर्श नियम लावले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या कक्षेत राहूनच उत्सवांमध्ये पोलीस आणि नागरिकांना सामंजस्याची भूमिका निभावी लागणार आहे. परिणामी, परिस्थिती बघुनच पोलिसांना निर्णय घ्यावे लागणार असल्याची माहिती ‘नवी मुंबई’चे पोलीस आयुक्त श्री. प्रभात रंजन यांनी वाशीत दिली.
सार्वजनिक उत्सव साजरे करताना मंडळांनी आवाजाच्या मर्यादेपेक्षा स्वत:वर कंट्रोल ठेवणे अधिक चांगले राहिल. ज्याप्रमाणे आपले आई-वडिल अथवा वरिष्ठ आपल्याला चांगली शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी बंधने आपोआपच येतात. त्याचप्रकारे उच्च न्यायालयाने देखील आपले सण-उत्सव शांततेत, निर्विघ्नं आणि कोणतेही गालबोट न लागता साजरे होण्यासाठी जी काही सध्या बंधने घातली आहेत, त्याचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असल्याचे सांगत सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करणार्या मंडळांनी सुरक्षितता आणि सतर्कतेवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना श्री. प्रभात रंजन यांनी यावेळी केली. तसेच मागणी केल्यास पोलीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना सुरक्षिततेचे धडे देण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अपर पोलीस आयुक्त विजय चव्हाण यांनी, न्यायालयाच्या नियमांची काटेकोरपणे पोलिसांना अंमलबजावणी करावी लागत असल्याचे सांगत पोलिसांसाठी जनता हीच परमेश्वर असल्याचे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्णय, प्रचलित नियम, जनतेला शांतताप्रिय उत्सव याचा उल्लेख करीत त्यांनी नियम पाळून सण-उत्सव साजरे करा, असे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अपर पोलीस आयुक चव्हाण, उपआयुक्त श्री. उमाप, श्री. मेंगडे यांनी उत्तरे दिली. या कार्यक्रमात व्यासपीठावर ‘नवी मुंबई’चे अपर पोलीस आयुक्त श्री. विजय चव्हाण, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण, पोलीस उपआयुक्त श्री. शहाजी उमाप (परिमंडळ-१), श्री. सुरेश मेंगडे (गुन्हे शाखा), श्री. अरविंद साळवे (वाहतूक शाखा), श्री. प्रशांत खैरे (विशेष शाखा), सहाय्यक आयुक्त दायमा, श्री. अरुण वालतुरे, आदि उपस्थित होते.
दरम्यान, सदर कार्यक्रमात परिमंडळ-१ मधील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलीस ठाणे निहाय पारितोषिके प्रदान करण्यात आली.