मुंबई : रेल्वे व एसटी फुल्ल, खासगी गाड्यांनी चालवलेली लूटमार लक्षात घेऊन कोकणवासीयांसाठी ‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष, कणकवली-देवगडमधील कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सलग दुसर्या वर्षी गणेश चतुर्थीला गावी जाणार्या कोकणी जनतेसाठी १०० रुपयांमध्ये बस सेवा जाहीर केली आहे.
गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या सिंधुदुर्गामधील जनतेला १२ ते १५ सप्टेंबर या कालावधीत २५ बस सोडण्यात येतील, अशी घोषणा नितेश राणे यांनी सोमवारी केली. या तिकिटांची नोंदणी वांद्रे येथील ‘स्वाभिमान’च्या मुख्य कार्यालयात ५ ते १० सप्टेंबरदरम्यान नोंदवण्याचे आवाहन राणे यांनी केले आहे.
गणेशोत्सव हा कोकणाचा मोठा सण आहे. कोकणी माणूस त्यानिमित्त गावी जातो. कोकणी जनतेच्या खिशावरील भार कमी करून त्यांना कुटुंबासह गणपतीसाठी गावी जाता यावे, यासाठी नितेश राणे यांनी गेल्या वर्षी गणेशोत्सवात १०० रुपयांमध्ये बस प्रवासाची सेवा दिली होती. राणे यांनी दरवर्षी कोकणवासीयांसाठी ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल,असे आश्वासन दिले होते. तो शब्द आमदार झाल्यानंतरही राणे यांनी पाळत या सुविधेची घोषणा केली.
कणकवली, मालवण, देवगड, सावंतवाडी, वेंगुर्ला, वैभववाडी, कुडाळ, दोडामार्ग या आठ तालुक्यांमध्ये राहणार्या कोकणवासीयांसाठी येत्या १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान दादर, बोरिवली, नवी मुंबई, वसई-विरार, नालासोपारा, डोंबिवलीतून २५ बस सोडल्या जातील, असे राणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातील आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले.
या बस तिकीटसाठी वांद्रे पश्चिम येथील ‘स्वाभिमान’च्या मुख्य कार्यालयात ५ ते १० सप्टेंबर दरम्यान सकाळी १० वाजल्यापासून नोंदणी केली जाईल. गेल्या वर्षी परतीच्या प्रवासासह बस सेवा १०० रुपयांत दिली होती. मात्र, परतीच्या प्रवासासाठी प्रवासी मिळाले नाहीत. त्यामुळे यंदा परतीच्या प्रवासाची सेवा नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.
*** वेळापत्रक-
१२, १३, १४ आणि १५ सप्टेंबर या दिवशी बस सोडल्या जाणार आहेत. एकूण २५ बसेस सोडल्या जातील.
*** कधी आणि कुठे करणार नोंदणी-
बसच्या तिकीट नोंदणी ५ ते १० सप्टेंबर या कालावधीत ‘स्वाभिमान’ डेक्कन कोर्ट, मूव्ही टाईम सबर्बिया सिनेमा जवळ, एस.व्ही. रोड, वांद्रे पश्चिम, या पत्त्यावर संपर्क साधावा.