नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान अंतगर्त देशातील स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका तृतीय क्रमांकावर तर राज्यात प्रथम क्रमांकावर मानांकीत असताना यामध्ये पाणीपुरवठा, मलनि:स्सारण व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन अशा विविध बाबींचा साकल्याने विचार करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगपालिकेला लाभलेले हे मानांकन अधिक उंचाविण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागांनी कार्यप्रणालीत अधिक सुधारणा करण्याचे निश्चित केले असून या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचर्याचे वर्गीकरण करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.
या कृती आराखड्यानुसार ओला व सुका कचरा असे कचर्याचे वर्गीकरण ज्याठिकाणी कचरा निर्माण होतो अशा नागरिक पातळीवरच केले जाणे महत्वाचे असल्याने मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिम हाती घेण्यात येत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दिली आहे. या मोहिमेअंतर्गत हँडबिल, पोस्टर्सद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाणार असून सोशल मिडियाद्वारेही नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाचा संदेश पोहचविण्यात येणार आहे. याशिवाय बसडेपो, रेल्वेस्टेशन, मुख्य चौक अशा वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्ये सादर केली जाणार आहेत. या पथनाट्यातून ओला कचरा म्हणजे काय? सुका कचरा म्हणजे काय? याची माहिती दिली जाणार असून नवी मुंबई शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांकडून असलेल्या अपेक्षा मांडण्यात येणार आहेत. या पथनाट्यांचे सादरीकरण शाळा, महाविद्यालये याठिकाणीही करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना याची माहिती देऊन त्यांच्यामार्फत त्यांच्या पालकांपर्यंतही कचरा वर्गीकरणाचा संदेश पोहचविण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ओल्या व सुक्या कचर्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या कचराकुंड्या देण्यात आल्या असून हिरव्या रंगाच्या कचरा कुंडीत ओला कचरा व निळ्या रंगाच्या कचरा कुंडीत सुका कचरा वेगवेगळा ठेवणे अपेक्षित आहे. सुक्या कचर्यामध्ये विशेषत्वाने बॅटरी सेल, तारा, धातू खिळे, थर्माकोल, कागद, प्लास्टिक पिशव्या, रबर, काच व काचेच्या बाटल्या अशा वस्तूंचा समावेश होतो. तर ओल्या कचर्यात भाजीपाल्याचा कचरा व उरलेले अन्न, चहापत्ती, फळभाज्यांचे अवशेष, अंड्यांचे कवच, नारळ, शहाळी, लाकूड, केस, नखं आदी वस्तूंचा समावेश होतो. हा ओला व सुका कचरा नागरिकाच्या घरापासूनच वेगवेगळा ठेवणे अपेक्षित असून यादृष्टीने नागरिकांची मनोभूमिका तयार करण्यावर विविध माध्यमातून भर दिला जाणार आहे.
यादृष्टीने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येक विभागामध्ये काही मोठ्या सोसायट्यांमध्ये एक ऑगस्टपासून ओला व सुका कचरा वेगवेगळा संग्रहण करण्याचा पथदर्शी प्रकल्प तेथील नागरिकांच्या सहकार्याने सुरु करण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. सध्या एन.आर.आय. कॉम्प्लेक्स से. ५० नेरुळ, आर्मी कॉलनी से. १५ नेरुळ, जिमी टॉवर वाशी, मोराज कॉम्प्लेक्स सानपाडा, ग्रोमा हाऊस तुर्भे, फाम सोसायटी कोपरखैरणे, समता सोसायटी ऐरोली अशा आणखी काही निवडक मोठ्या सोसायट्यांमधील नागरिकांचा मिळणारा उत्तम सहयोग लक्षात घेऊन आणखी काही सोसायट्यांच्या पदाधिकार्यांशी ओला व सुका कचरा नागरिक पातळीवरच वर्गीकरणाबाबत चर्चा करण्यात येत आहे.
नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी तसेच ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेऊन जागरुक नागरिकत्वाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.