नवी मुंबई : आपल्या प्रभागात वास्तव्यास असलेल्या बाजार समिती आवारातील कांदा बटाटा मार्केटमधील व्यापारी, खरेदीदार, माथाडी, मापाडी, वारणार, मेहता तसेच पालावाल महिला आणि बाजार समिती आवारातील कर्मचारी-अधिकारी व सुरक्षारक्षक यांच्या जिवित सुरक्षिततेची वस्तूस्थिती जाणून घेण्याकरता सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी बुधवारी, (दि. 2 सप्टेंबर) महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा-बटाटा मार्केटविषयी महापालिका प्रशासनाकडे असलेली माहिती मागविली आहे.
नवी मुंबई शहराची विकसिकरणाची प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळेस 1980च्या सुमारास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कांदा बटाटा मार्केट कार्यान्वित झाले. मार्केट कार्यान्वित झाल्यावर स्लॅप कोसळणे, छतातून माती कोसळणे, प्लॉस्टरला तडे जाणे असे प्रकार अल्पावधीतच घडल्याने मार्केटचे बांधकाम सदोष असल्याचे अल्पावधीतच स्पष्ट झाले. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सुमारे 12 वर्षापूर्वी कांदा बटाटा मार्केट धोकादायक घोषित केले आहे. आय.आय.टीने देखील कांदा-बटाटा मार्केट धोकादायक असल्याचा अहवाल दिलेला आहे. त्यानंतर काही वर्षे कांदा बटाटा मार्केटचे नाव महापालिका प्रशासनाकडून धोकादायक वास्तूच्या यादीत कांदा-बटाटा मार्केटचा समावेश करण्यात येत होता. या मार्केटच्या अनेक गाळ्यांवर टेकू लावून व्यापार चालत असल्याचे वारंवार पहावयासही मिळालेे होते. धोकादायक मार्केटमध्ये व्यापारी, खरेदीदार, माथाडी, मापाडी, वारणार, मेहता तसेच पालावाल महिला आणि बाजार समिती आवारातील कर्मचारी-अधिकारी व सुरक्षारक्षक आपला जीव मुठीत ठेवून वावरत असल्याचे विविध वर्तमानपत्रातही सातत्याने प्रकाशित झालेले असल्याचे नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
आपण, महापालिकेत प्रतिनिधीत्व करत असलेल्या प्रभाग 93 मध्ये नेरूळ सेक्टर 10 परिसरातील एलआयजीचा समावेश होतो. या एलआयजीमध्ये कांदा-बटाटा मार्केटमध्ये कार्यरत असणार्या व्यापारी, खरेदीदार, माथाडी, मापाडी, वारणार, मेहता तसेच पालावाल महिला आणि बाजार समिती आवारातील कर्मचारी-अधिकारी व सुरक्षारक्षक या घटकांचे निवासस्थान आहे. हे सर्व माझे मतदार असून त्यांचे माझे घरोब्याचे संबंध आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत बाजार समिती आवारातील कांदा बटाटा मार्केटच्या बांधकामाविषयी महापालिका प्रशासनाकडे जी माहिती उपलब्ध आहे, ती मला लेखी स्वरूपात देण्याची व्यवस्था व्हावी अशी लेखी मागणी नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून आजमितीला कांदा बटाटा मार्केटचा धोकादायक वास्तूमध्ये समावेश करण्यात येत नाही. मार्केटची पुर्नबांधणीदेखील झालेली नाही. त्यामुळे धोकादायक मार्केट अचानक सुस्थितीत कसे आले याबाबत महापालिका प्रशासनाने मार्केटमध्ये जावून प्रत्येक विंगमधील गाळ्याची बांधकाम तपासणी खरोखरीच केलेली आहे का, याचेही स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाकडून देण्यात यावे, तसेच महापालिका प्रशासनाने कांदा बटाटा मार्केटच्या बांधकाम स्थितीविषयी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे, मंत्रालयात लेखी पत्रव्यवहार केला असेल तर त्याचीही माहिती नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका प्रशासनाकडून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे.