** घणसोली गावात १०९ वर्षांपासून परंपरेचे होतेय जतन **
नवी मुंबई : पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या तसेच स्वातंत्र्यसैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या घणसोली गावात आजही गेल्या १०९ वर्षांपासून सुरु असलेल्या परंपरेच जतन केले आहे.
इंग्रजांच्या काळात लोकांना एकत्र जमण्यास बंदी असायची म्हणून सुरु करण्यात आलेली हरिनाम सप्ताहाची संकल्पना आजही २१ व्या शतकातही गावात कायम आहे. यातून या ग्रामस्थांच्या एकीचे दर्शन घडते. विशेषत: गोकुळाष्टमीचे बाजारीकरण करण्यापेक्षा त्याला आध्यात्मिक स्वरुप देण्यात येते. त्यानुसार गेल्या ३० ऑगस्टपासून सुरु झालेल्या या हरिनाम सप्ताहाची सांगता कृष्णजन्माष्टमीला होणार असून १८२ तास अखंड हरिनामाचा गजर सुरु राहणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात घणसोली गावाचे मोठे योगदान आहे. मुंबई, ठाणे, कोकणमधील स्वातंत्र्यसैनिकांना लढ्याची माहिती पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे केंद्र या गावात होते. १९०७ साली जेव्हा इंग्रजांनी सभा, बैठका आणि भाषणे अशा प्रकारे जमावबंदी घातली होती, तेव्हा ग्रामस्थांनी एकत्र येण्यासाठी जन्माष्टमी महोत्सवाला सुरुवात केली. यावेळी देवाच्या नामस्मराणाबरोबरच स्वातंत्र्य लढ्याची रणनीती ठरविली जात होती. तसेच लढ्यासाठी आवश्यक असलेला जमावही उपलब्ध होत होता. याच उत्सवातून स्वातंत्र्यसैनिकांना स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा मिळाली होती. त्यानुसार घणसोली गावात श्रावण प्रथमा ते गोकुळाष्टमीच्या मध्यरात्रीपर्यंत अखंडपणे भजन महोत्सव सुरु असतो. यावर्षी देखील ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता भजनास सुरुवात झाली असून ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता या महोत्सवाची सांगता केली जाणार आहे.