बेलापुर ः ‘सिडको’च्या जलवाहिनीतून अनधिकृतपणे वीज मोटार लावून पाणी चोरी करणार्या खारघरमधील हौसिंग सोसायटीधारकांना ‘सिडको’च्या पाणी पुरवठा विभागाने चांगलाच हिसका दाखवला आहे. सोसायटीमध्ये मोटार लावून ‘सिडको’च्या जलवाहिनीतून अनधिकृतपणे पाणी चोरी करणार्या खारघर सेक्टर-१२ मधील ३० सोसायटीतील वीज मोटार ‘सिडको’च्या पाणी पुरवठा विभागाने जप्त केल्या आहेत. ‘वीज मोटार जप्त केलेल्या हौसिंग सोसायटीधारकांनी यापुढे
पुन्हा वीज मोटार लावून सिडको जलवाहिनीतून पाणी चोरी केल्यास सोसायटीचा पाणी पुरवठा
सिडकोकडून खंडीत करण्यात येईल’, अशी तंबीही ‘सिडको’चे खारघर कार्यालयातील उपअभियंता (पाणी पुरवठा विभाग) राजेश हातवार यांनी वीज मोटार जप्त केलेल्या सोसायटीधारकांना दिली आहे.
खारघर परिसरात सिडकोकडून हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, गेल्या ८-१० महिन्यांपासून खारघर परिसरात अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने खारघरमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेले खारघरमधील नागरिक सिडको कार्यालयात तक्रारीकरण्याबरोबरच सिडको कार्यालयावर मोर्चे काढत आहेत.
दरम्यान, खारघर सेक्टर-१२ मधील बहुतांशी हौसिंग सोसायटींमध्ये ‘सिडको’ने जोडलेल्या जलवाहिनीतून अनधिकृतपणे वीज मोटार जोडून पाणी चोरी होत असल्याची माहिती ‘सिडको’चे उपअभियंता राजेश हातवार यांना मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी राजेश हातवार
यांनी ३ सप्टेंबर रोजी सकाळी सिडको कर्मचारी हेमंत तांडेल, सुरक्षा अधिकारी एस. आर. कुंभार, डी. डी. शिर्के यांच्यासह खारघर सेक्टर-१२ मधील हौसिंग सोसायट्यांमध्ये पाहणी केली असता सुमारे ३० सोसायटींमध्ये ‘सिडको’च्या जलवाहिनीतून अनधिकृतपणे वीज मोटार जोडून पाणी चोरी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पाणी चोरण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या हौसिंग सोसायट्यांमधील ३० वीज मोटार जप्त करण्याची कारवाई राजेश हातवार यांनी केली.
सिडको पाणी पुरवठा विभागाची पाणी चोरी करण्यासाठी वापरण्यात येणार्या वीज मोटार जप्त करण्याची कारवाई सुरु असताना संतप्त झालेल्या महिलांनी सिडको अधिकार्यांच्या वाहनाच्या चाकातील हवा काढून वीज मोटार जप्त कारवाईचा निषेध केला.
दरम्यान, खारघर सेक्टर-१२ मधील हौसिंग सोसायटीतील रहिवाशी वीज मोटार लावून सिडको जलवाहिनीतून पाणी चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले. पाणी चोरी करण्यासाठी वापरण्यात येणार्या खारघर सेक्टर-१२ मधील ३० सोसायटींमधील वीज मोटार जप्त करण्यात आल्या आहेत. खारघरमधील अजुनही काही हौसिंग सोसायट्यांमध्ये वीज मोटार लावून पाणी चोरी केली
जात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे यापुढे खारघरमधील सर्व हौसिंग सोसायट्यांमध्ये पाहणी करुन पाणी चोरीसाठी वापरण्यात येणार्या वीज मोटार जप्त करण्यात येणार आहेत. वीज
मोटार जप्त केलेल्या हौसिंग सोसायटीतील रहिवाशांनी पुन्हा वीज मोटार लावून पाणी चोरी केली तर त्या सोसायटीचा पाणी पुरवठा सिडकोकडून खंडीत केला जाणार आहे, असे ‘सिडको’चे उपअभियंता राजेश हातवार यांनी सांगितले.