नवी मुंबई ः शाळांमध्ये विद्यार्थीविद्यार्थीनींसाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आल्यामुळे पालकांची तारांबळ उडाली आहे. नवी मुंबई शहरात आधारकार्ड बनविणारी केंद्रे कमी असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, आधारकार्ड काढण्यासाठी सतत हेलपाटे मारण्याची वेळ नवी मुंबईतील नागरिकांवर येत आहे.
शासनाने व्यक्तीची एक युनिक ओळख म्हणून आधारकार्ड संकल्पना अमलात आणली आहे. आधारकार्ड काढण्यासाठी प्रारंभीच्या काळात नागरिकांनी प्रचंड उत्साह दाखवला होता. पण, नंतरच्या काळात आधारकार्ड सक्तीचे नाही असा खुलासा शासनाकडून करण्यात आल्यानंतर नागरिकांनी आधारकार्ड काढण्याबाबत उदासीनता दाखवली. मात्र, ऐन वेळी शासनाने फतवा काढून सर्व शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थीनींची इत्यंभूत माहिती सरल फॉर्ममध्ये भरण्याचे निर्देश दिले आहेत.
सरल फॉर्ममध्ये आधारकार्ड क्रमांक देखील टाकायचा असल्याने शाळांकडून विद्यार्थी-विद्यार्थीनींकडे आधारकार्ड करीता तगादा लावण्यात येत आहे. अगदी छोट्या-छोट्या चिमुरड्यांवर देखील ‘आधारकार्ड’ची झेरॉक्स प्रत जमा न केल्यामुळे शिक्षकवर्ग खेकसत आहे. त्यामुळे पालकवर्ग हवालदिल झाला असून, आधारकार्ड काढण्यासाठी पालकांना सतत हेलपाटे मारावे लागत आहेत.
वाशी सेक्टर-१५ मधील नवी मुंबई महापालिका वाशी विभाग कार्यालय आणि वाशी सेक्टर-१७ मधील वाशी प्लाझा इमारतीतील कार्वी सेंटर या दोनच ठिकाणी आधारकार्ड बनविण्याची केंद्र सुरु आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत आधारकार्ड नोंदणी केंद्रे सुरु असतात. मात्र, प्रथम येणार्या तीस जणांचीच कागदपत्रे या ठिकाणी आधारकार्ड बनविण्यासाठी स्विकारली जातात. त्यानंतरच्या नागरिकांना हात हलवत परत जावे लागते. पुन्हा दुसर्या दिवशी पहिल्या तीस जणांमध्ये आपला क्रमांक यावा यासाठी नागरिक या केंद्राच्या बाहेर आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरु होण्यापूर्वीच रांगा लावत आहेत. अनेक हेलपाटे मारुनही काम होत आधारकार्ड मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.