पुणे : पावसाची कोणतीही चिन्ह नसल्याने दिवसेंदिवस राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. मराठवाडयाप्रमाणे पुण्यातही पावसाने ओढ दिल्यामुळे पुण्यात दर एकदिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत धरणातील शिल्लक पाणी साठयाचा आढावा घेतल्यानंतर एक दिवसा आड पाणी पुरठवयाची घोषणा केली. सोमवारपासून दर एकदिवसा आड पाणी पुरवठा सुरु होणार आहे.
पुण्याला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला, वरसगाव, टेमघर, पानशेत या धरणांमध्ये मिळून फक्त १४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी यापुढे दर महिन्याला बैठक घेण्यात येणार आहे.
राज्यात विदर्भ वगळता सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जून महिना वगळता जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस सरासरी इतकाही झालेला नाही. दरवर्षी या दोन महिन्यात पावासाचे प्रमाण समाधानकारक असते. यंदा मात्र हे दोन महिने पावसाच्या प्रतिक्षेमध्येच गेले.
निदान सप्टेंबरमध्ये तरी परतीचा पाऊस समाधानकारक होईल अशी अपेक्षा होती. मात्र सप्टेंबरमध्येही पावसाने आतापर्यंत साफ निराशा केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या धरणांचीही अशीच स्थिती असल्याने, मुंबईत आधीच वीस टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.