नगर – मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (४ सप्टेंबर) नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्या दौर्यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई भेडसावत आहे. अशा परिस्थितीतही प्रशासनाने तीन हेलिपॅडसाठी दीड लाख लिटर पाण्याचा अपव्यय केला आहे. एवढ्या पाण्यात साडेसात हजार नागरिकांची तहान भागली असती.
नगर जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४९७ मिलिमीटर आहे. गेल्या वर्षी केवळ ३८२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे डिसेंबरपासूनच पाण्याच्या टँकरची मागणी सुरु झाली होती. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५०१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात काय स्थिती होईल याची आतापासूनच चिंता आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकर्यांच्या आत्महत्येचे लोण नगर जिल्ह्यातही पोहोचले आहे. गेल्या पंधरा दिवसांत पाथर्डी तालुक्यात दोन, तर श्रीगोंदे तालुक्यात एका शेतकर्याने आत्महत्या केली आहे.
या परिस्थितीत दौर्यावर येत असलेले मुख्यमंत्री केवळ पिंप्री पठार (ता. पारनेर) या एकाच गावातील पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत. ढवळेवाडी (ता. पाथर्डी) येथे कम्पार्टमेंट बंडिंग कामाची ते पाहणी करतील. सातवड (ता. पाथर्डी ) येथे सिमेंट नालाबांधाची पाहणी व वृक्षारोपण, पॉलिहाऊस, तसेच मीटरद्वारे पाणी पुरवठा कामाची ते पाहणी करतील. काटेवाडी (ता. जामखेड) येथे जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाला ते भेट देतील. राजुरी येथे कंपार्टंमेट बंडिग कामाची पाहणी करून ते आढावा बैठक घेणार आहेत.