मुंबई : बकरी ईदकरिता कुर्बानी करण्यासाठी गोवंश हत्या बंदी कायद्यातून काही दिवस सवलत देण्याची मागणी काही मुस्लिमांकडून होत असताना रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील ४० गावांतील मुस्लिम समाजाने मात्र बैलाची कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असल्याने बैलांच्या कत्तलीवर बंदी आहे. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या कायद्याचे पालन करण्याकरिता बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सवलत न मागण्याचा निर्णय येथील मुस्लिमांनी घेतला आहे.
राज्यातील मुस्लिम समाजाने या निर्णयाला पाठिंबा देऊन बैलांची कुर्बानी टाळण्याचा निर्णय घ्यावा, या उद्देशाने माणगाव तालुका अमन कमिटीने पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला आहे. माणगाव तालुक्यातील ४० गावांतील मुस्लिम नागरिकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. केवळ काही दिवसांसाठी सवलत मागणे चुकीचे आहे, जर सरकार हा कायदा रद्द करणार असेल, तर वेगळी बाब आहे, अन्यथा केवळ ईदच्या कालावधीसाठी सवलत न मागण्याचा निर्णय मागणार नाही, असे नागरिकांनी सांगितले.
याबाबत माणगाव तालुका अमन समितीचे उपाध्यक्ष व माणगावचे जिल्हा परिषद सदस्य असलम राऊत म्हणाले, की गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. आम्ही बैलांची कुर्बानी करणार नाही. त्याऐवजी बकर्यांची कुर्बानी होईल. ईदच्या पार्श्वभूमीवर सवलत मिळाली, तरीही बैलांची कुर्बानी न करण्याचा निर्णय समितीने सर्वानुमते घेतला आहे.