पनवेल : अनेक दिवसांपासून चर्चेत आणि प्रतीक्षेत असलेली पनवेल-चिपळूण डेमू या रेल्वेला शुक्रवारी (दि. ४) सकाळी पनवेल स्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखविला. गणेशोत्सव काळात धावणारी ही ट्रेन गणेशभक्तांना वरदान ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडाव्यात अशी प्रवाशांची अनेक वर्षापासूनची मागणी होती .त्यासाठी पनवेल प्रवासी संघानेही कोकण रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रवाशांच्या मागणीनुसार कोकण रेल्वेने या मार्गावर डेमू गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून ही गाडी मार्गस्थ झाली. त्यावेळी गणेशभक्तांसह चाकरमान्यांनी या गाडीचे जल्लोषात स्वागत केले.
या वेळी नगराध्यक्ष चारूशीला घरत, उपनगराध्यक्ष मदन कोळी, प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे, कार्यवाह श्रीकांत बापट मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष भालचंद्र लोहोकरे, के. जी. म्हात्रे, स्टेशन प्रबंधक डी. के. गुप्ता आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
पनवेल-चिपळूण प्रवासासाठी ५० रुपये मोजावे लागतील. या ट्रेनला एक एसी डबाही जोडण्यात येणार असून, त्याचे तिकीट ३९५ रुपये असेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. एसी डब्यातून प्रवास करण्यासाठी आरक्षण करता येणार आहे.
मध्य रेल्वेने पहिल्यांदाच पनवेल-चिपळूण अनारक्षित डेमू ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असून, ही ट्रेन ४सप्टेंबरपासून गणेशोत्सवात धावणार आहे. या ट्रेनच्या ४० ङ्गेर्या होणार आहेत. एसी प्रवासासाठी पनवेल ते खेडसाठी ३४५ रुपये, पेण-चिपळूसाठी २२१ रुपये आणि पेण-खेडसाठी १८० रुपये भाडे आकारण्यात येईल.
मध्य रेल्वेमार्गावरून धावणार्या पाच गणपती विशेष ट्रेेनला प्रत्येकी दोन जनरल सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत. ट्रेन नंबर ०१००१ सीएसटी-मडगाव ११ सप्टेंबरपर्यंत आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. या ट्रेेनला एक जनरल सेकंड क्लास डबा ठाण्यापासून तर दुसरा डबा पनवेलपासून जोडण्यात येणार आहे.
*** पनवेल-चिपळूण अनारक्षित ट्रेनचे थांबे ***
पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे, वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड आणि अजनी.
** एसी डब्यांतील तिकीट आरक्षण त्वरित सुरू करण्यात आले आहे.**