नवी दिल्ली : मूळचे शिक्षक व पत्रकार असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी समाजाने शिक्षकी पेशाचा सन्मान करावा, असे आवाहन केले. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवन परिसरातील डॉ. राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवले.
राष्ट्रपतींनी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थांना भारताचा राजकीय इतिहास शिकवला. हा विषय फक्त संदर्भ ग्रंथापुरता मर्यादित न ठेवता त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव मुलांना सांगितले.
विद्यार्थ्यांना त्यांनी राष्ट्रपति सर ऐवजी मुखर्जी सर असे म्हटल्यास मला खूप आनंद वाटेल असे म्हणत आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील गमती- जमतीही त्यांनी मुलांना सांगितल्या.
मी काही हुशार विद्यार्थी नव्हतो, मी अत्यंत खोडकर मुलगा होतो. परंतु मी खूप मेहनती होतो, असे राष्ट्रपतींनी सांगितले. शाळेला जाण्यासाठी त्यांना चार किलोमीटर पायी चालत जावे लागत असे. याबाबत मी आईकडे तक्रार केली. मात्र, तिने माझ्यासमोर कोणताही पर्याय नसल्याचे सांगितले. त्यानंतर मी खूप अभ्यास करू लागलो, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
वडिल स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असल्याने ते कधी तुरुंगात तर उर्वरित काळात पार्टी मुख्यालयात रहात असत. त्यामुळे आईनेच खडतर मेहनत करुन मला शिकवले. आईमुळेच खडतर मेहनत करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
भारताचा राजकीय इतिहास शिकवताना त्यांनी घटना लिहिण्यासाठी नियुक्त केलेल्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत केल्याचे यावेळी सांगितले. भारतीय राज्यघटना कशी तयार झाली याचे विवेचन राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना केले. देश स्वतंत्र झाल्यानंतर राज्यघटना तयार करण्याचे अवघड काम ३०० हून अधिक विद्वानांनी तीन वर्षे केले. लोकशाही भारतात होणारी सार्वत्रिक निवडणूक आपण एखाद्या उत्सवासारखी साजरी करतो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले. यात पुरुष आणि महिलांना समान अधिकार देण्यात आले आहेत. भारतात पहिल्यांदा १९५२ मध्ये झालेल्या निवडणुकीत १७.५ कोटी लोकांनी मतदान केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.