नवी मुंबई : महानगरपालिका आरोग्य विभाग मलेरीया / डेंग्यू नियंत्रणासाठी करीत असलेली कार्यवाही अत्यंत चांगली असून अशाप्रकारची उपाययोजना व प्रचार – प्रसिध्दी प्रणाली देशात इतरही ठिकाणी राबविली जावी याकरीता कृती आराखडा तयार करण्यात येईल असे मत राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे राष्ट्रीय सह संचालक डॉ. एस.एन.शर्मा यांनी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील साथरोग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतल्यानंतर व्यक्त केले. याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन त्यांनी महानगरपालिकेच्या नियंत्रण कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मलेरीया व डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गतीमान व व्यापक मोहीम राबवित असून शून्य मलेरीया हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे. संपूर्ण देशभरात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेची मलेरीया / डेंग्यू नियंत्रण कार्यप्रणाली ही उत्तम असल्याचे निदर्शनास येत असल्याने राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे राष्ट्रीय सह संचालक डॉ. एस.एन.शर्मा आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे किटकशास्त्रज्ञ डॉ.महेंद्र जगताप यांनी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राला भेट देऊन नागरी वसाहती, गाव-गावठांण तसेच झोपडपट्टी भागात फिरुन प्रत्यक्ष पाहणी केली.
याप्रसंगी त्यांचे समवेत महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक परोपकारी, हिवताप नियंत्रण विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर आणि संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ठिकठिकाणी जाऊन नियंत्रणात्मक कार्यवाहीचा आढावा घेऊन तसेच जनजागृतीसाठी राबविण्यात येणा-या कार्यप्रणालीची प्रत्यक्ष पाहणी करत डॉ. एस.एन.शर्मा यांनी ही कार्यप्रणाली राज्यात आणि देशात मलेरीया / डेंग्यू नियंत्रणासाठी आदर्श कार्यप्रणाली (रोल मॉडेल) म्हणून प्रस्तावित करणार असल्याचे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका मलेरीया / डेंग्यू आजारांच्या नियंत्रणासाठी डासअळी नाशक फवारणी, रासायनिक धुरीकरण, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याची तत्पर कार्यवाही, घरोघरी जाऊन रुग्ण संशोधन कार्यवाही तसेच सर्वेक्षण कार्यवाही अशाप्रकारच्या राबवित असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन समाधान व्यक्त करीत डॉ. एस.एन.शर्मा यांनी महानगरपालिकेची जनजागृतीपर प्रचार-प्रसार मोहीम चांगली असल्याचे मत नोंदविले. एनएस 1 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला रुग्ण म्हणजे डेंग्यूचा संशयीत रुग्ण असल्याने त्याला डेंग्यूचा रुग्ण म्हणणे योग्य ठरणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे डेंग्युबाबत संशयीत रुग्ण आणि डेंग्युचे प्रत्यक्ष निदान झालेला रुग्ण याबद्दलची वस्तुस्थिती अधिक व्यापक प्रमाणात जनतेपर्यंत पोहचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने यापुर्वीच प्रभावी कार्यवाहीला सुरुवात केली असून नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील वस्त्या, सोसायट्या, वर्दळीची ठिकाणे, बाजारपेठा, शाळा-महाविद्यालये अशा विविध ठिकाणी माहिती प्रसाराव्दारे मलेरीया / डेंग्यू आजारांबाबत घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.