मुंबई : यशस्वी सिनेमाची निर्मिती मुल्य जाणून आणि प्रेक्षकांची अचूक नस ओळखून सिनेमा निर्माण करणारे निर्माते मराठी सिनेसृष्ठीत अनेक आहेत. ज्यांचे सिनेमे एक अप्रतिम कलाकृती तसेच व्यावसायिकतेच्या उत्तम समीकरणाचे उदाहरण आहे. त्या यशस्वी निर्मात्यांच्या यादीत होली बेसिल प्रॉडक्शन हाउसचे विवेक कजारिया यांचे नाव आग्रहाने घेता येईल.
‘फॅण्ड्री’, ‘सिद्धांत’ या प्रदर्शित झालेल्या तर आगामी ‘चौर्य’, ‘एक नं’, राक्षस या सिनेमांची त्यांनी नवलखा आर्ट्ससोबत उत्कृष्ट निर्मिती केली आहे. नेहमीच वेगळ्या प्रयत्नात असणार्या विवेक कजारिया यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदाच दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून विवेक यांनी एक लघुपट दिग्दर्शित केला आहे. ‘दुर्गा’ असं या लघुपटाच नाव आहे.
आजोबा आणि नातीचे भावविश्व आणि गावातील एका कुशल मुर्तीकार ज्याची दुर्गा देवीवर अढळ श्रद्धा अशा व्यक्तीच्या जीवनाचा आढावा या लघुपटाच्या माध्यमातून घेतला आहे. ‘दुर्गा’ या लघुपटाचा वर्ल्ड प्रिमियर कोरिया येथे बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदा होणार आहे. भारतात होणार्या चित्रपट महोत्सवांमध्ये या सिनेमाची झलक आपल्याला लवकरंच पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री वीणा जामकर, साची आणि कल्याण चॅटर्जी यांच्या लघुपटात प्रमुख भूमिका आहेत. गेली अनेक वर्ष निर्माता म्हणून अग्रेसर असणार्या विवेक कजारिया यांचा दिग्दर्शक म्हणून देखील अनुभव तितकाच संवेदनशील होता. ते म्हणतात, मी काही काळ कोलकाता मध्ये राहिलो आहे. दुर्गा पूजा जवळून पहिल्या आहेत.
नवरात्रीतील त्या दिवसात दुर्गा देवीचा होणारा तो अभूतपूर्व सोहळा असतो. या क्षेत्रात माझ्या येण्याचा उद्देश हा फक्त उत्तम सिनेमे बनवण्याचा होता. जे माझं पॅशन आहे. गेली अनेक वर्ष निर्मिती क्षेत्रात काम करत असल्याने बर्याच गोष्टी शिकत गेलो. दिग्दर्शनाच्या माधमातून काही रोजच्या जीवनातील गोष्टी नव्या रुपात दाखवू शकतो हा विचार मी या लघुपटाच्या निमित्ताने मांडला आहे. दिग्दर्शनात येण्याची मिळालेली ही संधी नक्कीच माझ्यासाठी विशेष असेल, असे ते म्हणाले.