मुंबई : मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा केला जात असताना या उत्सवाला यंदाही अपघाताचे गालबोट लागले आहे. मुंबईत विविध ठिकाणी उंच मनोरे रचताना खाली पडून १३१ जण जखमी झाले आहेत.
या जखमींना उपचारासाठी मुंबईतील केईएम, नायर, शीव आणि शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यापैकी, ११८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून अन्य १३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भिवंडी येथे दहीहंडी बांधताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. गणेश अनंता पाटील (२९) असे या व्यक्तीचे नाव असून लोखंडी खांब डोक्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. गणेशचे दोन वर्षापूर्वीच लग्न झाले असून त्याला दोन महिन्यांचे बाळ आहे.
दरम्यान, दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या ६० जखमी गोविंदाना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सात जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. नायर रुग्णालयात ११ जखमींपैकी एकाला दाखल करून घेण्यात आले आहे.
तर शीव रुग्णालयामध्ये १९ जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून त्यातील दोन जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय सेंट जॉर्जेस, गोवंडीच्या शताब्दी व राजावाडी रुग्णालयातही काही जखमी गोविंदांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आहे.
दहीहंडी फोडण्यासाठी उंच थरावरून कोसळून मागील काही वर्षात अनेक जणांना जीव गमवावा लागल्याने उच्च न्यायालयाने २० फुटांपेक्षा अधिक उंचीची दहीहंडी बांधू नये, असे निर्देश दिले होते. मात्र तरीही काही आयोजकांनी गोविंदांना लाखो रुपयांची आमिषे दाखवून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थरांची ही स्पर्धा गोविंदा पथकांसाठी पुन्हा एकदा वेदनादायीच ठरली आहे.