मुंबई : घामाटलेल्या अवस्थेत प्रवास करणार्या मुंबईकरांना थंडगार प्रवासाचा आनंद देणारी वातानुकूलित लोकल जानेवारी २०१६ पासून रुळावर येण्याची चिन्हे आहेत. या लोकलचे दरपत्रक निश्चित केलेले नाही.
मात्र, २५ ते ४० किमीचे टप्पे ठरवले जाणार आहेत. ७५ आणि १०० रुपयांचे तिकीट आकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोरिवली ते चर्चगेट तिकिटासाठी प्रवाशांना १०० रुपये मोजावे लागतील. ही लोकल बारा डब्यांची ठेवण्याचा रेल्वेचा विचार आहे.
या वातानुकूलित लोकलचे तीन-तीन डबे लोकलला लावण्याचा विचार होता. मात्र, आता १२ डब्यांची संपूर्ण वातानुकूलित लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही लोकल आता जानेवारी २०१६पासून धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिका-यांनी दिली. ही सेवा प्रत्यक्षात येण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या १ ऑक्टोबरपासून लागू होणार्या वेळापत्रकात त्यानुसार बदल करण्यात येतील.
चर्चगेट ते बोरिवलीदरम्यान वातानुकूलित लोकलच्या दहा फेर्या चालवण्यात येणार आहेत. सकाळ आणि सायंकाळी दोन ते तीन फेर्या चालवण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार आहे.
या लोकलसाठी असून भाडेदर निश्चित झालेले नाही. यासाठी वातानुकूलित प्रथम वर्गाच्या कुर्सी यानाचा विचार केला जात आहे. लांब पल्ल्यांच्या मार्गावर एसी चेअर कारच्या अंतराच्या अनुषंगाने एसी लोकलसाठी दोन टप्पे विचारात घेतले जात असून त्यासाठी २५ ते ४० किमी अंतर ठरवले जाण्याची शक्यता आहे. त्यातून अनुक्रमे ७५ आणि १०० रुपये दर ठरवले जातील असे सांगण्यात येत आहे.