करवले, चेरिवली शाळा घेतल्या दत्तक
पनवेल : एखाद्या लोकप्रतिनिधीने शाळा दत्तक घेतली असली तरी शाळेतील शिक्षक, समन्वय समिती सदस्य आणि इतर सहकारी यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवू या, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्येक आमदाराला आपल्या तालुक्यातील शाळा दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या करवले आणि चेरिवली येथील शाळांची निवड आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. त्यानिमित्त शुक्रवारी (दि. 4) झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
शाळेतील विविध उपक्रम, त्यांची प्रगल्भता, तसेच शाळेची प्रगती या दृष्टिकोनातून पुढील तीन वर्षांत शाळा कशी असावी, यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व समन्वय समिती यांच्यासोबत बैठक घेतली जाऊन त्याची आखणी केली जाणार आहे. याशिवाय, राज्यभरातील शाळांत जे चांगले उपक्रम घडतात त्या प्रकारचे किंबहूना त्याहीपेक्षा अधिक कल्पक उपक्रम या शाळांमध्ये राबविले जायला हवेत, असा प्रस्ताव आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांसमोर मांडला.
या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाट मोकळी करून देऊन त्यांना वाव दिला पाहिजे. हल्लीच्या पिढीमध्ये विविध गुण असतात. विद्यार्थ्यांची प्रतिभा वाया जाऊ न देता त्यांना पोषक वातावरण तयार करून द्यायला हवे. संपूर्ण राज्यात फक्त शाळाच नव्हे; तर सर्व विद्यार्थीदेखील सर्वोकृष्ट कसे होतील, याकडे आपण लक्ष देऊ या, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
चेरिवलीत झालेल्या या कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी साबळे, जि. प. चे माजी सदस्य संजय पाटील, राजेंद्र भालेकर, राजेश कोळी, श्याम भालेकर आदी उपस्थित होते.