मुंबई : गृह रक्षक दलाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना गृह रक्षक दलाच्या पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे.
सध्या गाजत असलेल्या वादग्रस्त शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासात राकेश मारिया व्यस्त आहेत. येत्या ३० सप्टेंबरला राकेश मारियांचा कार्यकाळ संपणार होता. त्यामुळे त्यांची बदली अपेक्षित होती. मात्र त्याआधीच राकेश मारियांची तडकाफडकी बदली का करण्यात आली, असा प्रश्न केला जात आहे.
शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासात राकेश मारिया हे स्वत: अधिक लक्ष देत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पोलिसांना अन्य खटल्यांमध्येही लक्ष केंद्रीत करण्याची सुचना केली होती. तरीही पोलिसांनी या प्रकरणावरच अधिक भर दिल्याने मारिया यांची तडकाफडकी उचलबांगडी केल्याची चर्चा होत आहे.
गेल्यावेळीच जावेद अहमद यांचे नाव आयुक्तपदाच्या शर्यतीत होते. मात्र सेवा जेष्ठतेनुसार अहमद ज्येष्ठ असूनही त्यांना डावलून राकेश मारिया यांची आयुक्तपदी वर्णी लागली होती. राकेश मारिया यांनी ललित मोदी यांची लंडन येथे जाऊन भेट घेतली होती. यावरुनही मध्यंतरी मोठा वाद निर्माण झाला होता.