औरंगाबाद : पत्नीला नविन घरात ठेवण्याच्या इच्छेतून एका प्रेमवेड्याने पासवर्डचा वापर करुन एटीएममधील २३ लाख रुपये चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. औरंगाबादमधील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामनगरातील धूत हॉस्पिटलजवळ ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण पाराप्पा वाघमारे (२७, रा. एकनाथनगर) याने स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेच्या एटीएम मशीनचा पासवर्डचा वापर करुन त्यातील २३ लाख रुपये चोरल्याची कबुली दिली आहे. ही चोरी बायकोला नविन घरात ठेवण्याच्या इच्छेतून केल्याची माहिती किरणने पोलिसांना दिली.
किरण हा गेली काही वर्षे एटीएममध्ये पैसे भरणार्या सेक्युरिटी ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामाला होता. १५ फेब्रुवारी रोजी त्याचे लग्न झाले. पत्नीला स्वत:च्या नवीन घरात ठेवण्याची त्याची इच्छा होती. मात्र, कंपनीकडून मिळालेल्या पगारात त्याला घर घेणे अशक्य होते. त्यामुळे त्याने १७ एप्रिल रोजी नोकरीचा राजीनामा दिला आणि चोरीचा मार्ग निवडला.
स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या एटीएम मशीनबाहेर सुरक्षारक्षक नसल्याचे त्याला माहीत होते. तेथील सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बंद असल्याची माहिती त्याला होती. त्यामुळे एटीएम मशीनचा पासवर्ड माहिती असल्याने त्याने तिजोरी उघडून त्यातील मिळेल तेवढी रक्कम लांबविण्याची योजना आखली. तो या एटीएमवर पाळत ठेऊन होता. अखेर १७ जून रोजी सकाळी कोणी नसल्याची संधी साधून त्याने एटीएममध्ये प्रवेश केला. पासवर्ड दाबताच एटीएमची तिजोरी उघडली असता एटीएममधील २३ लाख ५ हजार ९०० रुपये पिशवीत टाकून तो पसार झाला.
याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चोरी कोणी केली याचा सुगावा लागत नव्हता. पोलीस कसून शोध घेत होते.
या दरम्यान किरण याने एकनाथनगर येथे घर खरेदी केले व तेथे तो पत्नीसह रहायला गेला. सदर प्रकार लक्षात येताच पोलिसांनी किरणला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता सदर प्रकार उघडकीस आला. त्याच्याकडून आठ लाख रोख रक्कम मुकुंदवाडी पोलिसांनी हस्तगत केली आहे.