ठाणे : गर्दीने खचाचाच भरलेले स्टेशन म्हणून ठाणे स्टेशनचा उल्लेख आतापर्यंत नेहमीच होत आला आहे. परंतु यापुढे ‘फेरीवाल्यांनी खचाखच भरलेले रेल्वे स्टेशन’ असे म्हटले जाईल, इतकी दुरवस्था सध्या ठाणे रेल्वे स्थानकाची झाली आहे. ठाणे स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा महापूर आलेला दिसत आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांनी या परिसरात अक्षरश: उच्छाद मांडला आहे. कोणाचीही भीती न बाळगता रेल्वे पुलावरही हे फेरीवाले अगदी राजरोसपणे स्टॉल लावत आहेत, परिणामी तेथे होणार्या गर्दीमुळे पुलावरून चालणेही अवघड झाले आहे. परंतु अद्यापपर्यंत यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने ठाणे स्टेशन परिसरातून प्रवास करणार्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या अधिकार्यांनी या फेरीवाल्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे तेथून रोज प्रवास करणार्या नागरिकांकडून बोलले जाते. स्टेशन परिसरातील उभे असलेले सर्व अनधिकृत स्टॉल कोणा तीन माणसांकडून चालवले जातात, अशी माहिती तेथेच स्टॉल लावणार्या एका स्टॉलधारकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.
शाम, बरकत तसेच कमरूशेठ या नावाची ही कोणी माणसे हा गोरखधंदा करत असल्याचे कळते. दिवसाकाळी ४०० ते ८०० रुपयांचा हफ्ता घेऊन ही मंडळी त्या बदल्यात स्टेशन परिसरातील महापालिकेच्या जागेवर अनधिकृतपणे बाकडी लावण्यासाठी जागा देतात. त्यामुळे स्टेशन परिसरात या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस बर्याच प्रमाणात अडथळा निर्माण होऊन तेथून प्रवास करणार्या नागरिकांनाही विनाकारण याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या फेरीवाल्यांमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे स्टेशन परिसरातून चालणेही कठीण झाले आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांकडून हे हफ्तेखोर हप्त्यापोटी महिन्याला लाखो रुपये घेतात.
पालिकेतील अतिक्रमण विभागातील काही अधिकारी या तिघांशी सामील आहेत, अशी चर्चा उघडपणे केली जाते. त्याबाबत महापालिका अतिक्रमण विभाग उपायुक्त अशोक बुरपुले यांना विचारले असता, पालिका अधिकार्यांपैकी कोणीही अशा प्रकारे पैसे घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे जर कोणी पैसे घेत असेल तर आम्हाला त्याचा पुरावा द्यावा. तसेच अतिक्रमण विभागाकडून रोजच या अनधिकृत स्टॉलधारकांवर कारवाई केली जाते, असेही त्यांनी पुढे सांगितले. परंतु असे असताना आजही महापालिका अतिक्रमण विभाग, ट्राफिक पोलीस, रेल्वे सुरक्षा दल तसेच काही स्थानिक गुंडाच्या संगनमताने हा सगळा कारभार चालू असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी अनेकवेळा फेरीवाल्यांचे नियोजन करण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही अधिकार्याला यात फारसा रस आहे, असे मात्र दिसून आले नाही. हे फेरीवालेही अगदी जोरजबरदस्तीने प्रवाशांच्या अंगावर धावून येताना दिसतात. त्यांना कोणाचीही भीती नसल्याचे दिसून येते. परिणामी स्टेशन परिसरात उद्या काही भयंकर हाणामारीची घटना घडण्याची शक्यताही त्यातून नाकारता येत नाही.
यापूर्वीही या फेरीवाल्यांचे चित्रीककरण करणार्या काही पत्रकारांना या फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांनी आपली किती दहशत निर्माण केली आहे हे या घटनेतून दिसून येते. या मागे कोणत्यातरी मोठया टोळीचा हात असल्याचे बोलले जात आहे. दिवसागणीक ५ ते ६ हजार रुपयांचा धंदा हे फेरीवाले करतात, असे एका फेरीवाल्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पुढे जाऊन ही फेरीवाल्यांची समस्या अधिक उग्र रूप धारण करू नये म्हणून वेळीच महापालिका अतिक्रमण विभाग तसेच रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे.