नवी मुंबई : महापालिका सर्वसाधारण सभेदरम्यान विरोधी पक्षाचे सदस्य महापौर सुधाकर सोनवणेंना कामकाजादरम्यान सल्ला देत असतानाच महापौर सुधाकर सोनवणे यांनी तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्यासाठी चर्चेकरता मी पुरेसा वेळ देत आहे. कृपय्या वर्तमानपत्रात बातम्यांमधून अथवा मिडीयामध्ये चमकण्यासाठी स्टंटबाजी करू नका असे खडे बोल महापौर सुधाकर सोनवणे यांनी बुधवारी (दि. ९ सप्टेंबर) विरोधी पक्षाच्या सदस्यांना सुनावले.
महापालिका सभागृहात आरोग्य विषयक लक्षवेधीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कामकाजादरम्यान नेहमीप्रमाणे आजही सावळागोंधळ सुरूच होता. विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे सभागृहात आरोग्य विषयक बाबींवर पोटतिडकीने आपली भूमिका मांडत होते. आरोग्यविषयक बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून आपण शोकप्रस्ताव तातडीने उरकण्यास प्राधान्य दिले. तथापि कामकाजाची दिशा दुसरीकडेच भरकटत असल्याची नाराजी व्यक्त करत चौगुले यांनी सभागृहात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना आपली भूमिका मांडण्याची संधी महापौरांनी द्यावी अशी मागणी चौगुले यांनी केली.
विरोधी पक्षनेते विजय चौगुले आपली भूमिका मांडताना नवी मुंबईकरांचे आरोग्य व अन्य बाबींचा उहापोह करून सभागृहाचे लक्ष आपणाकडे वेधत असल्याचे पाहून सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांकडून महापौर सुधाकर सोनवणेंना चिठ्ठी पाठविण्याचा कार्यक्रम सुरूच होता. सत्ताधारी पक्षाचे काही मातब्बर नगरसेवक आपल्या जागेवरच बसून महापौर सुधाकर सोनवणेंना त्यांच्या अधिकाराची जाणिव करून देत होते.
हे दृश्य पाहून सिडकोचे माजी संचालक व महापालिका सभागृहातील शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ नामदेव भगत यांनी तात्काळ उठून महापौरांना अधिकाराची जाणिव करून देणार्यांनी महापौरांना कर्तव्यही असल्याची संबंधितांना जाणिव करून दिली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेप्रमाणे कर्तव्य व हक्काची जाणिव प्रत्येकाला करून दिली असल्याचे नामदेव भगत यांनी सभागृहात सांगितले.
सत्ताधारी पक्षाकडून महापौरांकडून पाठविल्या जाणार्या चिठ्ठी प्रकरणाबाबत शिवसेना नगरसेवक एम.के.मढवी यांनीही ताशेरे ओढत महापौरांना त्यांच्या भूमिकेप्रमाणे कामकाज करून देण्याची संधी द्यावी असे सांगितले.
विरोधी पक्षाचे नगरसेवक सातत्याने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उहापोह होत असल्याचे पाहून महापौर सुधाकर सोनवणे यांनी मिडीयात चमकण्यासाठी असल्या प्रकारची स्टंटबाजी करू नका, असे खडे बोल सुनावत विरोधकांच्या या खेळीतील हवाच काढून घेतली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपण महापौरपदी विराजमान झाल्याचे आपणास पावलोपावली ध्यानात असून महापौर पदावर आंबेडकरी विचारांचा माणूस बसल्यामुळेच सभागृहात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना कामकाजादरम्यान बोलण्याची व्यापक संधी मिळत आहे, हेही लक्षात ठेवा. अन्यथा कामकाज कशा प्रकारे चालवायचे, कोणते विषय कधी संपवायचे याचे मला ज्ञान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा माणूस असल्यामुळेच मी तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्याची संधी देत आहे, त्याचा स्टंटबाजीसाठी अथवा मिडीयामध्ये चमकण्यासाठी वापर करू नका असे खडे बोल महापौर सुधाकर सोनवणे यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना सुनावले.