मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर पावसाने दिलासा दिला. गुरूवार सकाळपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.
दादर, सायन, कुर्ला, चेंबूर, ठाणे, मुलुंड, आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरातही पाऊस काही प्रमाणात आहे. पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे.
मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसामुळे हवेत चांगला गारवा आहे. येत्या चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मराठवाडा ते लक्षद्वीप बेटांपर्यंत कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागात पावसाने जोर धरला आहे. यामुळे कोरड्या दुष्काळाने चिंताग्रस्त झालेल्या शेतक र्यांनाही पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यातच पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोल्हापूरसह सातारा, पुणे, नाशिक, शिर्डी, नगर, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, पंढरपूरसह मराठवाड्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली.
कोकणातही अनेक भागात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. पुणे वेधशाळेने पुढील पाच दिवस राज्याच्या अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे.