नेरूळ : नवी मुंबई मनसेने केलेल्या पाठपुराव्यामुळे यावर्षी देखील नवी मुंबईतील सर्व मराठी, इंग्रजी माध्यमांच्या तसेच सीबीएसई, आयसीएसई आणि महाराष्ट्र बोर्डाच्या शाळांना गौरीगणपतीची 5 दिवसांची (17 ते 21 सप्टेंबर) सुट्टी नवी मुंबई महापालिका शिक्षण मंडळाने जाहिर केली आहे. गेली 4 वर्षे मनसे या विषयाचा पाठपुरावा करुन शिक्षण मंडळास गणपती सणानिमित्त 5 दिवसांची सुट्टी जाहिर करण्यास भाग पाडत आहे. यामुळे नवी मुंबईतील तमाम गणेश भक्तांना आणि त्यांच्या पाल्यांना गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरी तसेच आपल्या गावी जाऊन गणपतीचा सण उत्साहात साजरा करता येणार आहे, असे मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, सदर विषयाचे गांभिर्य ओळखून गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतीच नवी मुंबई महापालिका शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी दत्तात्रय नागरे यांची भेट घेऊन, यावर्षी सुध्दा गौरी-गणपतीची 5 दिवस सुट्टी जाहिर करण्यासंदर्भात निवेदन सादर केले होते. मनविसेतर्फे सदर मागणी करण्यात आल्यानंतर शिक्षण मंडळाने देखील त्वरित नवी मुंबईतील सर्व मराठी, इंग्रजी माध्यमांच्या, सीबीएसई, आयसीएसई आणि महाराष्ट्र बोर्डाच्या शाळांना सुट्टी जाहिर करण्यासंबंधी पत्रक जारी केले आहे.
दरम्यान, सलग चौथ्या वर्षी मनसेने केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने गणपतीसाठी 5 दिवसांची सुट्टी जाहिर केल्यामुळे नवी मुंबईतील पालकवर्गाने आनंद व्यक्त केला असून कित्येक पालकांनी त्यासाठी दूरध्वनी करुन मनसेच्या पदाधिकार्यांना धन्यवाद दिल्याचे सविनय म्हात्रे यांनी सांगितले.
गौरी-गणपतीचा उत्सव महाराष्ट्रातील जनतेचा श्रध्देचा आणि सांस्कृतिक जिव्हाळ्याचा सण म्हणून ओळखला जातो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील बहुतांशी चाकरमानी आणि नागरिक गणेशोत्सवासाठी किमान पाच ते सहा दिवस आपल्या पाल्यांसह कोकणात अथवा इतरत्र आपल्या गावी जात असतात. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील सर्व सरकारी अथवा खाजगी शाळांच्या जाहिर सुट्ट्यांच्या कार्यक्रमानुसार शिक्षण मंडळाने गणेशोत्सव काळात पाच ते सहा दिवस सुट्ट्या जाहिर करणे आवश्यक आहे. पण, यावर्षी नवी मुंबईतील खाजगी इंग्रजी शाळा तसेच सीबीएसई आणि आयसीएसई शाळांनी गणेशोत्सव काळात फक्त एक दिवसाची सुट्टी जाहिर करुन या उत्सवाला दुय्यम स्थान देण्याचा प्रकार केला आहे.
यात संतापजनक प्रकार म्हणजे काही सीबीएसई आणि आयसीएसई शाळांनी गणेशोत्सव काळातच परीक्षांचे आयोजन केल्याची बाब निदर्शनास आल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिली. त्यामुळे अशा प्रकारांमुळे खाजगी इंग्रजी शाळा मराठी आस्मतेला ठेच पोचवत असल्याचे काळे यांनी सांगितले.