ठाणे : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना राबवण्यात येत असली तरी त्यापलिकडे जिल्ह्यातील गावतलावांमधील गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढवल्यास जिल्हा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल आणि अनेक छोट्या गावांची पाण्याची समस्या दूर होईल. त्यामुळे यासंदर्भात धडक कार्यक्रम हाती घेण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडली. पावसाने या वर्षी ओढ दिली असून राज्यभरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातही आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना श्री. शिंदे यांनी दिल्या. तसेच, जिल्ह्यातील धरणांव्यतिरिक्त स्थानिक पातळीवर पाण्याच्या अन्य स्रोतांचाही शोध घेण्याची सूचना त्यांनी केली. श्री. शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण ग्रामीण येथील वाकळण तलावातील गाळ काही महिन्यांपूर्वी काढून तलावाचे क्षेत्र मोठे केल्याने यंदा तलावातील पाणीसाठा वाढला असून ग्रामस्थांनी २५ एकर क्षेत्रावर भाजीपाल्याचे पीक घेतले आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली असता सर्वच गावतलावांमधील गाळ काढण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घ्या, त्यासाठी केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहाता सेवाभावी संस्था, सीएसआर आदी पर्यायांचा अवलंब करा, स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घ्या, असे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले.
** बारवी प्रकल्पग्रस्तांना नोकरी
बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. येथील ५ गावे व ७ पाड्यांमधील प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाईचे योग्य पॅकेज देतानाच जिल्ह्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांनी घरटी एका व्यक्तीला रोजगार द्यावा, असा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.
** वाळूतस्करांवर कारवाईचे आदेश
जिल्ह्यात तीन वर्षांपासून वाळूउपशाला परवानगी नसली तरी बेकायदा वाळू उपशाचे प्रसंग वारंवार समोर येत आहेत. आपण स्वतः मुंब्रा येथील खाडीत चालणार्या वाळूउपशाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीही दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीत वाळूचोरांवरील कारवाईत हयगय करू नका, त्यासाठी पोलिस, मेरिटाइम बोर्ड आणि परिवहन विभागाचेही सहकार्य घ्या, या सर्व विभागांनी समन्वयाने नियोजनबद्ध कारवाई करा, असे निर्देशही श्री. शिंदे यांनी दिले.
** गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवा
गणेशोत्सव नजीक आला असून जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देशही श्री. शिंदे यांनी संबंधित महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेला दिले. सणासुदीच्या काळात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
** शिक्षकांचे पगार वेळेवर व्हावेत
दोन-दोन, तीन-तीन महिने शिक्षकांचे पगार रखडतात, याबाबत श्री. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. हा प्रकार चुकीचा असून नेमकी अडचण कुठे आहे, याची माहिती श्री. शिंदे यांनी विचारली असता शिक्षण संचालकांकडून प्रादेशिक उपायुक्तांकडे निधी येतो आणि मग तो जिल्हा परिषदेला हस्तांतरीत होतो, अशी माहिती देण्यात आली. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे जिल्हा परिषदेला थेट बँक ट्रान्स्फरद्वारे पैसे मिळण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी पालक सचिव के. पी. बक्षी यांना दिले.
निवडणुकीच्या कामावर असताना अपघाती मृत्यू आलेल्या काही शिक्षकांच्या नुकसान भरपाईचा प्रश्नही रेंगाळला असून ही भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घ्यायला हवा, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. तसेच, काही कारणास्तव ही कामे करण्यास शक्य नसलेल्या शिक्षकांवर फौजदारी कारवाई करू नये, असे निर्देशही त्यांनी दिले.
**धोकादायक बांधकामांच्या समस्यांवर बैठक
धोकादायक इमारती रिकाम्या करताना भाडेकरूंचा हक्क अबाधित ठेवण्याचे निर्देश संबंधित महापालिकांना यापूर्वीच दिले आहेत. जिल्ह्यातील धोकादायक तसेच अनधिकृत इमारतींचा प्रश्न गंभीर असल्यामुळे त्याबाबत स्वतंत्र बैठक लवकरच घेण्यात येईल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.a