नवी मुंबई ः अप्पासाहेब जोशी प्रतिष्ठान, नवी मुंबई आणि नवी मुंबई साहित्य परिषद तर्फे उद्या 13 सप्टेंबर 2015 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वाशी सेक्टर-9 ए मधील योग विद्या निकेतन भवन मध्ये ज्येष्ठ साहित्यिक कवी ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित एक दिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
कवी ग्रेस साहित्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळच्या अध्यक्षा श्रीमती माधवी वैद्य यांच्या हस्ते होणार असून, या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान कवी ग्रेस यांच्या साहित्याचे अभ्यासक प्रा. शिरीष गोपाळ देशपांडे भूषविणार आहेत.
यावेळी प्रा. श्रीमती वीणा सानेकर (सोमय्या कॉलेज) आणि प्रा. सौ. मीरा कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत. कवी ग्रेस साहित्य संमेलनात ग्रेस यांच्या कवितेतील निसर्गाची रुपे, ग्रेस यांची कविता म्हणजे एक प्रचंड घोटाळा, गे्रस यांच्या कवितेतील महत्त्वाच्या मर्यादा, ग्रेस यांच्या कवितेतील स्त्रियांची महत्त्वाची रुपे, ग्रेस यांच्या कवितेतील भारतीय परंपरेतील सांस्कृतिक संदर्भ आणि ग्रेस यांचे ललित लेखन इत्यादी विषयांवर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
निबंधासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींना (1200 शब्द), शिक्षकांसाठी (1200 शब्द) तसेच खुल्या गटासाठी (1500 शब्द) शब्दमर्यादा बंधनकारक आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी 3000, 2500 आणि 2100 रुपये रोख रक्कम तसेच स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती कवी ग्रेस साहित्य संमेलन आणि निबंध स्पर्धा संयोजक मोहन ढवळीकर यांनी दिली.
कवी ग्रेस साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी कार्यकारी मंडळ सदस्य सौ. अरुंधती जोशी, मोहन ढवळीकर, दिलीप जांभळे, सौ. वृषाली बापट, नरेंद्र घाटे, सौ. अरुणा देशपांडे आणि संतोष जाधव आदी मान्यवर विशेष परिश्रम घेत आहेत.