पनवेलः रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पार्टी पनवेल शहर, पनवेल तालुका भाजप महिला कमिटी आणि तेजस्विनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ११ सप्टेंबर रोजी पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील मंडळ सभागृहात आयोजित मंगळागौर स्पर्धा कार्यक्रम प्रचंड उत्साहात संपन्न झाला.
ज्येष्ठ नेत्या सौ. शंकुतलाताई ठाकूर यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिमेचे पुजन करुन तसेच प्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ दादुस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंगळागौर कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी ‘गव्हाण ग्रामपंचायत’च्या सरपंच रत्नप्रभा घरत, पनवेल पंचायत समिती सदस्या सुजाता जितेकर, नगरसेविका कल्पना ठाकूर, नीता माळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुहासिनी शिवणेकर, यशोदा पाटील, मंदा भगत, नीता घाटुगडे, सुगंधा कोळी, रुबिना बोम्बेवाला, सपना पाटील, लिना पाटील, कस्तुरी जंगम, अदिती मराठे आदी मान्यवर उपस्थित होत्या.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून महिलांना आपले कलागुण दाखविण्यासाठी चांगले व्यासपिठ उपलब्ध करुन दिले आहे. मंडळाच्या माध्यमातून महिला विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. महिलांनी कलागुण आत्मसात करुन स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, आत्मनिर्भर व्हावे यासाठी मंडळामार्फत महिलांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. त्याचा लाभ अनेक महिलांनी घेतला असून आपले जीवन सुखकर केले आहे. मंगळागौर सण भारतीय सणसंस्कृतीचा भाग आहे. मंगळागौर सण निमित्ताने महिला एकत्र येवून निसर्गाशी संस्कृतीशी निगडीत असे विविध खेळ खेळून गाणी म्हणतात. त्यातून संस्कृतीचे जतन केले जात असते, असे मनोगत यावेळी ‘गव्हाण’च्या सरपंच रत्नप्रभा घरत यांनी व्यक्त केले. महिलांनी एकत्र येऊन एकमेकीशी विचारविनिमयाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करुन आपला उत्कर्ष साधावा, असे आवाहनही ‘गव्हाण’च्या सरपंच रत्नप्रभा घरत यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात कलावती कलामंच (ज्येष्ठ नागरीक संघ), सुवर्णा मुंडे यांचा मैत्री गु्रप मोहोपाडा, पनवेल येथील अदिती मराठे यांचा तळ्यात मळ्यात ग्रुप, बेलपाडा येथील महालक्ष्मी ग्रुप, आदी मंडळांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात कलावती कला मंचला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. ज्येष्ठ नेत्या शकुंतलाताई ठाकूर यांच्या हस्ते प्रथम क्रमांक विजेत्या कलावती कला मंच सदस्यांना गौरविण्यात आले. स्पर्धेत मोहपाडा येथील मैत्री गु्रपला द्वितीय तर तळ्यात मळ्यात गु्रपला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमात सरस्वती महिला मंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.