* 350 लेखी निवेदने प्राप्त * 18 विषयांवर चर्चा
नवी मुंबई : एकाच ठिकाणी सर्व शासकीय आणि निमशासकीय खात्यातील अधिकार्यांना जनतेसमोर आणून नागरी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आमदार संदीप नाईक यांनी सुरु केलेल्या जन संवाद या उपक्रमातील पहिला कार्यक्रम ऐरोली विभागासाठी आज पार पडला. सेक्टर 14मधील लेवा पाटीदार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विविध विभागांशी संबंधीत 350 निवेदने प्राप्त झाली. 18 विषयांवर चर्चा झाली.
जन संवादासारख्या उपक्रमांमधून एकाच वेळेस जनतेच्या समस्या जाणून घेण्याची संधी मिळत असते. असे सांगून आमदार नाईक यांनी लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रेरणेने सुरु केलेला जन संवाद यापुढे विभागवार आयोजित करण्यात येईल, अशी माहिती दिली. जनसंवादामधून प्राप्त निवेदनांवर संबंधीत खात्याच्या अधिकार्यांकडून सात दिवसात अहवाल घेतल्यानंतर कार्यवाही झाली, याची माहिती संबंधीत निवेदनकर्त्याला देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
रविवार सुटटीचा दिवस असतानाही आजच्या जन संवाद कार्यक्रमास महानगर गॅस, महावितरण, पोलीस, एमआयडीसी, पालिका, कांदळवण, वाहतुक नियंत्रण शाखा आदी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर सुधाकर सोनावणे, राष्ट्रवादी काँंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष नगरसेवक अनंत सुतार, स्थानिक नगरसेविका संगीत पाटील, ऐरोलीचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील तसेच इतर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दिवा गाव भागात महानगर गॅसच्या जोडण्या मिळत नसल्याची तक्रार रविंद्र आवटी या स्थानिक नागरिकाने केली. त्यावर जेथे अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकते, तेथे गॅसजोडणी देण्याची तयारी महानगर गॅसच्या अधिकार्यांने दाखविली. कंपनीने तातडीने दिवा गाव भागात गॅसची जोडणी द्यावी, अशी सुचना आमदार महोदयांनी केली. महानगर गॅस कंपनीला खोदकामासाठी परवानग्या हव्या असतील तर त्या समन्वयाने देण्यात याव्यात, अशी सुचना पालिकेच्या अधिकार्यांना आमदार नाईक यांनी केली.
बाबुराव कुरेशी आणि इतर नागरिकांनी रेशनिंग पत्रिकेवर जादा उत्पन्न दाखविण्यात आल्याचे सांगून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य मिळत नसल्याची माहिती दिली. ऐरोलीसाठी स्वतंत्र शिधावाटप कार्यालयाची गरज व्यक्त केली. स्वतंत्र कार्यालयासाठी पालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करुन दिली आहे, असे आमदार नाईक यांनी उत्तरात सांगितले. या संबंधी आतापर्यत अनेक बैठका घेतल्या असून येत्या 6 ते 7 महिन्यांत ऐरोलीत शिधावाटपचे उपकेंद्र होईल, असा विश्वास व्यक्त केला.
पटणी रोडच्या दुरावस्थेबददल नागरिकांनी एमआयडीसीच्या अधिकार्यांना जाब विचारला. रस्त्यावरील खडडे बुजविण्यात आले असल्याचा अधिकार्यांचा दावा खोटा असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. त्यावर येत्या आठवड्यात खडडे बुजविले नाही तर मी स्वतः त्या ठिकाणी येवून त्याची गंभीर दखल घेईन, या शब्दात आमदारांनी लोकभावनेची दखल घेतली. सेक्टर 20मधील नेवा गार्डन सोसायटीने लोक सहभागातून बगिचा विकसीत केला आहे. बगिचा शेजारील पट्ट्यात त्याचा विस्तार करण्याची मागणी सोसायटीचे सदस्य संदीप कळंबे यांनी केली. ही जागा सिडकोची असल्याचे त्यावर कोणते आरक्षण आहे याची माहिती घेवून आमदार निधीतून गार्डन विकसीत करुन देवू अशी ग्वाही आमदार नाईक यांनी सोसायटीच्या सदस्यांना दिली.
कायदा, सुव्यवस्था आणि वाहतुककोंडी या विषयी देखील चर्चा झाली. अपुरे पोलीस कर्मचारी पाहता पोलीसमित्र सारखी योजना राबवून जनतेचे सहकार्य घेण्याची सुचना सेक्टर 5मधील सुहास शिंदे यांनी केली. रस्त्यांवरील गुर्दुल्यांच्या त्रासाविषयी महिलांनी तक्रार केली. फ्रान्शिला हत्येसारखा दुर्देवी प्रकार पुन्हा घडू नये यासाठी शाळा परिसरात सीसीटिव्ही कॅमरे बसविण्याची सुचना करण्यात आली. पोलीस मित्र योजनेसाठी पोलीस आयुक्त आणि वेळ पडली तर शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी सर्वप्रथम सीसीटिव्ही कॅमरे बसविणारी नवी मुंबई महापालिका होती, असे त्यांनी नमूद केले. सीसीटिव्ही कॅमेर्यांची संख्या पालिकेच्या माध्यमातून वाढविण्याची सुचना आमदार महोदयांनी महापौर सोनावणे यांना केली. स्मार्ट सिटी योजनेसाठी नवी मुंबईची निवड झाली आहे. या योजनेअतर्गत केंद्र सरकारकडून सीसीटिव्ही कॅमेर्यांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन घ्यावा, अशी सुचना देखील केली. ऐरोली विभागातील वाहतुककोंडी सोडविण्यासाठी महापौरांनी व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी आणि इतर घटकांची बैठक घेवून चर्चा करावी, असे आमदार नाईक म्हणाले. विभागात बहुमजली वाहनतळ निर्मितीला पालिकेच्या माध्यमातून प्राधान्य देण्यात येईल, असे नमूद केले. दिवा जेटटी रोड येथे दशक्रीया विधीच्या सुविधेसाठी कांदळवण विभागाने परवानगी दिल्यानतर आमदार निधीतून ही सुविधा उपलब्ध करुन देवू, असे आश्वासन त्यांनी या परिसरातील रहिवाशांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले.
आरोग्याविषयी नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना आमदार नाईक यांनी साथ रोगांबददल जनजागृती करण्याचे निर्देश पलिकेच्या अधिकार्यांना दिले. ई टॉयलेट सुरु करण्याची सुचना केली.
रस्त्यांच्या देखरेखीबददल बोलताना आमदार नाईक पालिका अधिकार्यांना उददेशून म्हणाले की, हमी कालावधीनंतर रस्त्यांवर खडडे पडले तर त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतुद करा. कोपरखैरणे, रबाळे आदी भागांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असेही ते म्हणाले.
महावितरण कंपनीकडून वाढीव वीजबिलांचा मुद्दा जन संवादमध्ये चांगलाच गाजला. वीजेच्या लपंडावामुळे वीज उपकरणे मोठ्या संख्येने नादुरुस्त होतात याविषयी निवेदने आली होती. बिघाड झालेले विजेची मिटर बसविल्याने जादा वीजबीले येत आहेत. राज्य सरकारने सबसीडी बंद केल्याने अव्वाच्या सव्वा बिले येत आहेत, रिडींग व्यवस्थीत घेतले जात नाही, अशी कारणमिमांसा नागरिकांनी यावर चर्चा करताना केली. यावर जेवढा वापर तेवढेच बिल गेले पाहिजे. ही समस्या सुटली नाही तर लोकभावनेची दखल घेवून आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा आमदार नाईक यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिला. येत्या आठवडाभरात महावितरण आणि पालिकेच्या अधिकार्यांची एक बैठक घेण्याची सुचना महापौर सोनावणे यांना केली. वीजबीलांबाबत नेमके मार्गदर्शन करण्यासाठी आमदार नाईक यांनी उच्च स्तरीय बैठक आयोजित करावी, असे आवाहन महापौरांनी या विषयावर बोलताना केले. किरण न्यायनित यांनी टोलमुक्ती केव्हा होणार? अशी विचारणा केली असता आमदार म्हणाले की, ऐरोली, वाशी आणि खारघर येथील टोल माफ व्हावेत यासाठी सर्वप्रथम मागणी केली होती. मुंबईतील एन्ट्री पॉईंटचे टोल बंद करण्याचा निर्णय लवकर सरकार घेणार असून त्यामध्ये आपण मागणी केल्याप्रमाणे ऐरोली आणि वाशी येथील टोलचा समावेश आहे. आमदार नाईक यांनी ही माहिती देताना उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. आमदार नाईक यांच्या या जनसंवाद उपक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने पक्षभेद बाजूला ठेवून हजेरी लावली आणि नागरी समस्या सोडविण्याचे निवेदन त्यांना दिले.