काठमांडू : नेपाळ हे पुन्हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव सोमवारी नेपाळच्या संसदेत बहुमताने फेटाळण्यात आला. संसदेतील दोन तृतीयांश खासदारांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. मात्र संसदेच्या या निर्णयाविरोधात नेपाळमध्ये नागरिकांनी मोठया प्रमाणात निदर्शने करून या निर्णयाचा निषेध केला.
नेपाळमध्ये २००६ सालापर्यंत राजेशाही अस्तित्वात होती. त्यामुळे तोपर्यंत हे राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून अस्तित्वात होते. मात्र २००६ साली राजेशाही रद्द झाल्यानंतर नेपाळमध्ये धर्मनिरपेक्ष सरकार आले. त्यानंतर नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी या पक्षाने संसदेत नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यात यावे व पुन्हा राजेशाही पद्धत अस्तित्वात यावी, असा प्रस्ताव मांडला.
हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी संसदेच्या दोन तृतीयांश सदस्यांनी त्याच्या बाजूने मतदान करणे गरजेचे होते. मात्र दोन तृतीयांश खासदारांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केल्याने तो फेटाळला गेला. यावेळी नेपाळच्या संसदेबाहेर हिंदू राष्ट्राची मागणी करणार्या शेकडो नागरिकांनी निदर्शने केली.