जळगाव : भाजपचे दिग्गज नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची याचा मोठा राजकीय पेच निर्माण झालाय. या गावातील ग्रामपंचायतीवर २५ वर्षात प्रथमच शिवसेनेचा सरपंच खुर्चीवर बसलाय.
एकूण ११ जागांसाठी मतदान झालं होत, त्यात शिवसेनेला ४ तर भाजपला ७ जागांवर यश आलं होतं. मात्र गावगाड्याची धुरा ज्या सरपंचावर असते ते पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. अनुसूचित जातीचा एकही सदस्य निवडून आला नसल्यानं पर्यायाने खडसे गटाला सरपंच पदावर पाणी सोडावे लागलं.
ही संधी शिवसेनेच्या ताराबाई भिल यांना चालून आली. तर उपसरपंचपदी भाजपचे संजय चौधरी यांची वर्णी लागलीय. बहुमत असल्याने कोथळी ग्रामपंचायतीवर सत्ता आपलीच असा दावा भाजपने केलाय तर सरपंच आमचा असल्याने सत्ता आमचीच असा प्रतिदावा शिवसेनेन केलाय.
कोथळी ग्रामपंचायतीतील सत्तेच्या या आकड्यांच्या खेळावरून मुक्ताईनगर मतदार संघातील राजकारण भविष्यात चांगलच तापणार आहे.