नवी दिल्ली : आकाशवाणीवरुन प्रसारीत होणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाव्दारे आदर्श अचारसंहितेचे उल्लंघन होत आहे त्यामुळे या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी कॉंग्रेसने केली होती.
कार्यक्रमाच्या आशयातून अचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आले तरच, अशा प्रकारच्या तक्रारीची दखल घेतली जाईल असे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्याने स्पष्ट केले.
मन की बात कार्यक्रम दर रविवारी आकाशवाणीवरुन प्रसारीत होतो. तक्रार झाली म्हणून लगेचच मन की बात, मंत्रिमंडळ बैठकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेणार नाही. मंत्रिमंडळाच्या निर्णयातून किंवा कार्यक्रमाच्या आशयातून अचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले तरच, कारवाई होईल असे निवडणूक अधिकार्याने सांगितले.
तक्रार झाल्यानंतर आयोग रेकॉर्डींग तपासून बघेल त्यानंतर निर्णय घेईल. हरयाणा विधानसभा निवडणुकीच्यावेळीही कॉंग्रेसने मन की बात कार्यक्रमा विरोधात अशाच प्रकारची तक्रार केली होती त्यावेळी निवडणूक आयोगाला काही आक्षेपार्ह आढळले नव्हते असे या अधिकार्याने सांगितले.