अनंतकुमार गवई
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या सप्टेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सादर केलेला नवी मुंबई महापालिकेचा सन २०१४-२०१५ या वर्षातील वार्षिक पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल अवलोकन होऊन राज्य शासनाकडे पाठविण्याच्या प्रस्तावास ‘नवी मुंबई’चे महापौर सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली.
नागरी घनकचरा व्यवस्थापन (हाताळणी) नियम २००० नुसार वर्षनिहाय अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका महासभेने सन-२००३ मध्ये मंजूर केलेल्या आकृती आराखड्यानुसार कंत्राटी पद्धतीने दैनंदिन रस्ते, गटारे, पावसाळापूर्व गटारे आणि कचरा वाहतुकीची कामे सुरु करण्याबाबत धोरणात्मक निर्णय झालेला आहे. त्यास अनुसरुन वाशी विभाग कार्यक्षेत्रातील वाशी रेल्वे स्थानकासमोरील फोर कोर्ट एरिया वगळता सार्वजनिक रस्ते, पदपथ, पावसाळापूर्व गटारे सिडको व्यवस्थापनाने नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत केली असून, त्याठिकाणची दैनंदिन साफसफाई आणि पावसाळापूर्व गटार सफाई करण्याची सूचना सिडकोमार्फत महापालिकेस करण्यात आलेली आहे. त्यानुसार वाशी सेक्टर-३० आणि वाशी सेक्टर-३० ए मधील दैनंदिन रस्ते सफाई आणि पावसाळापूर्व गटार सफाई कामे समग्र पद्धतीने कंत्राटी तत्वावर करण्यास तसेच त्याकरीता येणार्या प्रथम वर्षाकरीता ६० लक्ष ८४ हजार वार्षिक अंदाजपत्रकीय खर्चास महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
तसेच महापालिका मुख्यालयातील मोबाईल सेवा सुस्थितीत, अखंडीत आणि सुरळीत चालण्याकरीता आय.बी.एस. युनीट लावण्यासाठी मे. थ्री. जी. इन्फ्रा. नेटवर्कस् या कंपनीस भाडेतत्वावर जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव महापालिका महासभेत मंजूर करण्यात आला.