सूरत : प्रशासनाकडून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता एकता यात्रा काढण्याचा प्रयत्न करणारा पाटीदार पटेल आरक्षण समितीचा नेता हार्दिक पटेल आणि त्याच्या ३५ समर्थकांना गुजरात पोलिसांनी शनिवारी सूरतच्या वारच्छा भागातून ताब्यात घेतल.
कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हार्दिक आणि त्याच्या समर्थकांना ताब्यात घेतल आहे. त्यांनी रॅली काढण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती असे सूरतचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले.
ताब्यात घेतल्यानंतर हार्दिक आणि त्याच्या समर्थकांना सूरतच्या पोलिस मुख्यालयात नेण्यात आले. सूरतमध्ये सर्व प्रकारची इंटरनेट सेवा २४ तासांसाठी बंद करण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना २२ वर्षीय हार्दिकने पोलिस कारवाईचा निषेध केला आहे. राज्य सरकारला आमचा आवाज दडपून टाकायचा आहे. त्यांना आमचा छळ करायचा आहे. गुजरात सरकार आणि पोलिसांना राज्यात हिंसाचार हवा आहे. सरकारची ही कृती लोकशाही विरोधी आहे असे हार्दिकने म्हटले आहे.
उलटया दांडी यात्रेला परवानगी नाकारल्यानंतर हार्दिकने शुक्रवारपर्यंत आपल्या एकता रॅलीबद्दल कमालीची गुप्तता बाळगली होती. शनिवारी सकाळी हार्दिकचा सहकारी आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीचा संयोजक अल्पेश काथरियाने सूरतच्या वारच्छा भागातून एकता रॅली काढणार असल्याचे जाहीर केले.