संदीप खांडगेपाटील : 8082097775
नवी मुंबई : देशामध्ये गरीबीमुळे होणारी उपासमार, शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्या हे चित्र आपणाला भूषणावह नसून यापुढे हे चित्र कोठे असता कामा नये. कष्ट करणार्या प्रत्येक हाताला पोटभर अन्न व सुखसुविधा या भेटल्याच पाहिजेत. हे विश्वची माझे घर या संकल्पनेप्रमाणे आपल्या देशातील सर्वधर्मिय साधुसंतांनी विश्वाला गवसणी घालण्याचा प्रयास केला आहे. आपल्या देशात ग्लोबल वार्मिगमुळे जनजागृती आली असल्याचे प्रतिपादन लोकनेते गणेश नाईक यांनी रविवारी (दि. 20 सप्टेंबर) वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात कार्यक्रमादरम्यान केले.
स्वच्छता नवी मुंबई अभियांनातर्गत ई टॉयलेट लोर्कापण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण व रोजगार योजनेचा शुभारंभ लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते झाला. त्यावेळी लोकनेते गणेश नाईक बोलत होते.
नवी मुंबई शहर चांगले आहे असे लोक आता बोलू लागले आहेत असे बोलून लोकनेते गणेश नाईक आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, केंद्र शासनाकडूनही चांगले शहर म्हणून नवी मुंबईला विविध पारितोषिकांचा वर्षाव होवू लागला आहे. चांगले रस्ते, पदपथ, गटर, वॉटर-मीटर-गटरच्या सुविधा म्हणजे चांगलर शहर नाही तर सर्वांगपूर्ण जीवन जगण्याचे गरजा भागविणारे शहर म्हणजे परिपूर्ण शहर होय. वन टाईम प्लॅनिंगच्या माध्यमातून मी नवी मुंबईला चांगल्या शहराचे स्वप्न दाखविले होते. पण स्मार्ट सिटीमुळे हे चांगले की ते चांगले अशा संभ्रमात लोक पडले असल्याचे गणेश नाईकांनी यावेळी सांगितले.
ई-टॉयलेट संकल्पना नवी मुंबईमध्ये सर्वत्र राबवा. शहरवासियांकरता अर्थकारणाचा चांगला वापर करा. शहर आजारी पडू नये म्हणून काळजी घ्या. रोग होईल. रोग झाल्यावर डॉक्टरांवर व औषधांवर खर्च करण्यापेक्षा रोग होवू नये म्हणून खर्च करा. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर खर्च करा. ई-टॉयलेट ही संकल्पना त्याचाच एक भाग असल्याचे लोकनेते गणेश नाईकांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.
आपल्याकरता आपणच प्रयास केले पाहिजे. चांगले आरोग्यपूर्ण जीवन पाहिजे असेल तर सर्वांचेच हात पुढे आले पाहिजे. सर्वाचेच योगदान असेल तर सुंदर शहराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. स्मार्ट सिटीत 550 एकरांचा समावेश होतो. त्यामध्ये सर्व सुविधा अभिप्रेत आहेत. मोनो,मेट्रो, अंर्तगत टनेल, स्काय वॉक, सर्व विकासाच्या जवळ जाणार्या गोष्टी, रोजगाराची उपलब्धता, गतीमान गोष्टींनी स्मार्ट सिटीची निर्मिती होत असल्याचे लोकनेते गणेश नाईकांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.
आरोग्यसुविधेला प्राधान्य देताना पामबीच मार्गावर व ठाणे बेलापूर मार्गावर दोन फॅक्सी उपलब्ध करण्यात याव्यात. अपघात होवूच नये या मताचे आपण आहोत. तथापि अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना जागेवरच डॉक्टर, नर्स व आरोग्यसुविधा जागेवरच उपलब्ध झाल्या पाहिजेत, तरच अपघातग्रस्तांचे जीव वाचतील. या कामासाठी 3 ते 4 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. फायरब्रिगेडसाठी महागड्या गाड्या आणल्या. टोलेजंग इमारतीकरता शिड्या आणल्या. आग लागली नाही म्हणून केलेली उपाययोजना व्यर्थ गेली अशातला भाग नाही. वापर झाला तरी नाही तरी आपण तयारीत असले पाहिजे. सर्व सुविधा आपणाकडे तत्पर उपलब्ध असल्याच पाहिजेत. स्मार्ट सिटी करता नवी मुंबई शहराची निवड झाली असली तरी स्मार्ट सिटीच्या अंतिम टप्प्यात नवी मुंबईचा प्रथम क्रमाकांकरताच संबंधितांना विचार करावा लागेल यासाठी आपण एकत्रित परिश्रम केले पाहिजेत असे आवाहन लोकनेते गणेश नाईकांनी यावेळी केले.
2014 साली तत्कालीन महापौर सागर नाईकांनी नवी मुंबईतील बेरोजगारीशी आपणाशी चर्चा केली होती. सुशिक्षितांना, उच्चशिक्षितांना कोणीही रोजगार देतो, पण अकुशल घटकांचे काय. त्यांच्याकरता हा उपक्रम राबविण्यात येत असून ट्रेनिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ट्रेनिंग घेणार्यांना रोजगार मिळाल्याशिवाय महापालिका या यंत्रणांना पैसे अदा करणार नाही. 2000 लोकांना सुरूवातीला रोजगार मिळेल अशी आपली संकल्पना होती. पण 5000 लोकांना रोजगार मिळणार असल्याचे महापौर सुधाकर सोनवणेंनी स्पष्ट केले आहे. बेरोजगारी हटविण्यासाठी 5 5 कोटीएवजी 10 कोटी गेली तरी चालतील, पण बेरोजगारांना रोजगार हा मिळालाच पाहिजे. बेरोजगारांची निराशा हटली तरच पैशाचे चीज झाल्याचे समाधान भेटेल असे लोकनेते गणेश नाईकांनी यावेळी सांगितले.
व्यासपिठावर बसलेली मंडळी ही जबाबदार मंडळी असून नवी मुंबईचे भवितव्य घडविण्यासाठी कार्यरत आहेत. आत्मविश्वासाने ही माणसे तुमची सेवा करण्यासाठी कार्यरत आहेत. स्मार्ट सिटीमध्ये प्रथम बक्षिस म्हैसूरला मिळाले. म्हैसूर ही तर राजाची राजधानी आहे. दुसरे पारितोषिक एक लाख लोकसंख्येच्या शहराला मिळाले आहे. आपल्या शहरामध्ये खाडी,खाणी, डोंगर, झोपडपट्टया, रेल्वे, स्लम विभाग पाहता आपणाला मिळालेला पुरस्कार ही स्तुत्य बाब आहे. या शहराच्या विकासात पत्रकारांचेही योगदान आहे. ही मंडळी टीकेतून आपल्यातील कमतरता दाखवित असतात. त्यांनी टीका केली तर नाराज होवू नका अथवा स्तुती केली तर हूरळून जावू नका. नम्रपणे चुकांचा स्वीकार करा. गतीमान वाटचालीकरता बेरोजगारांना नोकर्या मिळणे आवश्यक आहे. नोकर्या मिळाल्या तर बेरोजगारांना आत्मविश्वास प्राप्त होणे शक्य होणार असल्याचा आशावाद लोकनेते गणेश नाईकांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस व्यक्त केला.
नवी मुंबई शहर हे केवळ घरांच्या किंमतीकरता महाग शहर असले तरी अन्य बाबतीमध्ये या शहरात स्वस्ताईच असल्याचे सांगून नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, या शहरामध्ये अवघ्या 50 रूपयांमध्ये 30 हजार लीटर पाणी मिळते. यंदा पाऊस समाधानकारक नाही. 2001 साली लोकनेते गणेश नाईक यांच्या निर्देशानुसार तत्कालीन महापौर संजीव नाईकांनी नवी मुंबईकरांकरता प्रशासनाच्या माध्यमातून मोरबे धरण विकत घेतले. अन्य शहरे दरडोई केवळ 220 लीटर पाणी देत असताना नवी मुंबई महापालिका मात्र दरडोई 336 लीटर पाणी देत आहे. पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले तर ऑगस्ट 2016 पर्यत आपणास पाणी कमी पडणार नसल्याचे महापौरांनी सांगितले.
नवी मुंबई शहरात स्मार्ट सिटींतर्गत 370हून अधिक प्रकारच्या नोकर्या उपलब्ध आहेत. बेरोजगारांनी संधीचे सोने करत कौशल्य आत्मसात केले पाहिजे. शहराला गुणवंत कामगारांची गरज आहे. बेरोजगारी हटविण्यासाठी लोकनेते गणेश नाईक यांच्या निर्देशानुसार तत्कालीन महापौर सागर नाईकांनी या कार्यवाहीस प्रारंभ केला होता. निवडणूकांमुळे टेंडर उशिरा निघाले. वर्षभरापूर्वीच ही योजना कार्यन्वित करण्याचा गणेश नाईक व सागर नाईक यांचा मानस होता. 5 लाख लोकांचा दरवर्षी रोजगार मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही कार्यरत असून या शहरात एकही बेरोजगार असता कामा नये ही आमची संकल्पना आहे. यामुळे पारावर बसून गप्पा मारण्याचा, कुटाळक्या करण्याचा प्रकार बंद होईल असा आशावाद यावेळी महापौर सुधाकर सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमात सभापती गिरीश म्हात्रे यांनी प्रास्तविक पर भाषणातून कार्यक्रमाची संकल्पना विषद केली. सभापती अशोक गुरखे, सभापती मोनिका पाटील, सभापती अॅड. अपर्णा गवते, मनपा समाजविकास विभागाच्या उपायुक्त तृप्ती सांडभोर यांनी आपल्या भाषणातून कार्यक्रमाचे स्वरूप सांगत योजनांची व उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी व्यासपिठावर माजी महापौर सागर नाईक, माजी उपमहापौर अशोक गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, युवकचे जिल्हाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक सुरज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिका पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, अॅड. भारती पाटील, नगरसेविका छाया म्हात्रे, दिपाली गवते, नगरसेविका संगीता बोर्हाडे, नगरसेवक लिलाधर नाईक, मुनवर पटेल, नगरसेविका मढवी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कोंडे यांनी केले.