मुंबई : बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने उर्वरित शिक्षेतून माफी मिळावी यासाठी केलेला दयेचा अर्ज राज्यपाल विद्यासागर राव यांनी फेटाळून लावला आहे.
त्यामुळे संजय दत्तला उर्वरित बारा महिन्यांची शिक्षा भोगावीच लागेल. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तच्या पाचवर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.
संजयने आधीच १८ महिने तुरुंगात काढले असल्याने त्याला साडेतीन वर्ष तुरुंगात काढावी लागणार होती. त्यातील तीस महिने संजयने पूर्ण केले असून, अजून वर्षभराची त्याची शिक्षा बाकी आहे.
संजयला वारंवार मंजूर होणार्या पॅरोलच्या रजेवरुनही आतापर्यंत अनेकदा वाद झाले आहेत. इतर कैद्यांपेक्षा त्याला विशेष वागणूक दिली जाते असा नेहमीच आरोप होतो. मे २०१३ मध्ये संजय उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात गेला. तेव्हापासून संजयने आतापर्यंत कायदेशीर आधार घेऊन १४६ दिवस तुरुंगाबाहेर काढले आहेत. सध्याही तो पॅरोलच्या रजेवर बाहेर आहे. यासाठी त्याने मुलीच्या आजारपणाचे कारण दिले आहे.