नवी मुंबई : चहावाल्याला पिस्तूलचा धाक दाखवून खंडणी मागणार्या शिवसेनेच्या पदाधिकार्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे.
आशिष काळे असे त्याचे नाव असून तो शिवसेनेच्या वाहतूक सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. चहाच्या टपरीवर कारवाई टाळण्यासाठी त्याने ३५ हजारांची खंडणी मागितली होती. कोपरखैरणे सेक्टर १९ येथे चहा व भुर्जी पावची टपरी चालवणार्या नंदकिशोर गोस्वामी यांना त्याच परिसरातील आशिष काळे हा खंडणीसाठी धमकावत होता. त्याने गोस्वामी यांच्या टपरीची महापालिकेकडे तक्रार देखील केली होती. मात्र टपरीवर होणारी कारवाई टाळण्यासाठी तो गोस्वामी यांच्याकडे ३५ हजार रुपये खंडणी मागत होता. त्यापैकी ५ हजार रुपये त्याने घेतले होते. परंतु गणेशोत्सव व वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने झालेल्या खर्चामुळे गोस्वामी यांनी त्याला उर्वरित रक्कम दिली नव्हती. याचा राग आल्याने काळेने साथीदाराच्या मदतीने गोस्वामी यांचे अपहरण केले होते. ते वाशीला जात असताना दोघांनी त्यांना जबरदस्ती मोटरसायकलवर बसवून जुहूगाव येथे निर्जनस्थळी नेले. तिथे पिस्तूलचा धाक दाखवून उर्वरित ३० हजार रुपये न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे गोस्वामी यांनी कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली होती.
बुधवारी दुपारी काळे हा गोस्वामी यांना धमकावण्यासाठी पुन्हा येणार होता. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला होता.
नवी मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकार्यांपेक्षा वाहतुक सेनेच्याच पदाधिकार्यांचे मोठ्या प्रमाणात लागलेले होर्डीग पाहता शिवसेनेपेक्षा शिवसेनेची वाहतुक सेनाच मोठी झाली असल्याचे उपहासाने शिवसेनेच्या वर्तुळात बोलले जात आहे. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेरूळ पश्चिमेलाही अन्य पक्षातून शिवसेनेत आलेले घटक वाहतुक सेनेत आपले पुर्नवसन करून मोठ्या प्रमाणावर करत असलेली होर्डीगबाजी शिवसेनेच्या नेतेमंडळींना खटकू लागली आहे.