दिपक देशमुख
नवी मुंबई : श्री गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो व नागरिक या कालावधीत एकत्र येत असतात हे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून मलेरीया / डेंग्यू आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक परोपकारी यांच्या नियंत्रणाखाली व्यापक स्वरूपात जनजागृतीपर प्रचार- प्रसार मोहिम राबविण्यात येत आहे.
यामध्ये विभागाविभागांतील नागरी आरोग्य केंद्रांचे अधिकारी, कर्मचारी आपापल्या क्षेत्रातील वसाहती, सोसायट्यांमधील तसेच मोठ्या स्वरूपात साजर्या होणार्या गणेशोत्सव मंडळांना भेटी देत असून त्याठिकाणी नागरिकांना एकत्र जमवून मलेरीया/डेंग्यू नियंत्रणासाठी घ्यावयाच्या काळजीविषयी माहिती देत आहेत. यामध्ये घरात किंवा आजुबाजूला पाणी साठवून ठेवले असेल किंवा साठले जाऊ शकते अशी नजरेतली व दुर्लक्षित असलेली डास उत्पन्न होऊ शकणारी ठिकाणे शोधून ते पाणी काढून टाकणे, त्या वस्तू स्वच्छ करून पूर्णपणे कोरड्या करणे, आवश्यक तेवढाच पाणीसाठा एक -दोन दिवसच करणे व त्यातही डास उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणे, घरात किंवा परिसरात कुठे रूग्ण आढळल्यास त्वरीत नागरी आरोग्य केंद्रास कळविणे अशाप्रकारची संपूर्ण माहिती दिली जात आहे. ही माहिती सामाजिक बांधिलकी जपत आपल्या शेजार्यांना, ओळखीच्यांनाही सांगा असे त्यांना आवाहनही करण्यात येत आहे. तसेच त्याठिकाणी याबाबतची हस्तपत्रकेही वाटण्यात येत आहेत. श्री गणेशमुर्ती विसर्जन स्थळांवर याबाबतचे माहिती व जनजागृतीपर होर्डींग लावण्यात आले आहेत.
मलेरीया / डेंग्यू आजारांच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभाग डास उत्पत्ती स्थाने शोध मोहिम, औषध फवारणी अशी प्रतिबंधात्मक कार्यवाही करीत असून जनतेपर्यंत जाऊन हे आजार रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि आजार झाल्यास त्वरीत करावयाच्या उपाययोजना याविषयीची माहिती पोहचविण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये स्थानिक नगरसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभते आहे.
मलेरीया / डेंग्यू आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया आणि आपल्याला असलेली मलेरीया/ डेंग्यू नियंत्रणासाठीची माहिती सामाजिक जबाबदारी मानून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचवावी तसेच आपल्या घर, परिसरात डास उत्पत्ती स्थाने शोधण्यासाठी येणार्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना सहकार्य करावे असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.