** लोकसहभागातून विकासाकरीता 29 सप्टेंबर रोजी विशेष नागरिक बैठकीचे आयोजन **
दिपक देशमुख
नवी मुंबई : आधुनिक शहर म्हणून नावाजले जाणारे नवी मुंबई शहर पाणी पुरवठा, मलनि:स्सारण व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन व इतर नागरी सुविधांच्या अत्याधुनिक दर्जेदार प्रकल्पांमुळे विविध स्तरांवर नावाजले जात आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत झालेले आहे. अशाप्रकारे उत्तम दर्जाची व नागरिकांना समाधानकारक अशी सेवासुविधापुर्ती केली जात असताना त्यामध्ये अधिक भर घालत नवी मुंबई हे आधुनिक शहर आता स्मार्ट सिटीकडे झेपावत आहे.
केंद्र शासनामार्फत नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचाविण्यासाठी व स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपुरक शहरे निर्माण करण्यासाठी 25 जून 2015 पासून केंद्र शासनामार्फत मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी मिशन जाहीर करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत नमूद मार्गदर्शन सूचनांनुसार राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची महाराष्ट्र राज्यातील पहिल्या दहा शहरांमध्ये निवड झाली आहे.
अभियानात निवड होण्यासाठी दुसर्या टप्प्यात स्मार्ट सिटी केंद्र शासन स्तरावर देशभरातील 100 शहरांमधून पहिल्या टप्प्यात फक्त 10 शहरांची निवड होणार आहे. हे संपूर्ण अभियान स्पर्धात्मकरित्या राबविण्यात येणार असून नवी मुंबई शहराचा प्रस्ताव उत्कृष्ट दर्जाचा असणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाने स्मार्ट सिटी अंतर्गत लोक सहभागातून विकास या सूत्रानुसार विविध पातळीवर नागरिकांशी संवाद साधून त्यांच्याकडून प्राप्त होणार्या सूचना, कल्पक संकल्पना यांचा विचार करुन स्मार्ट सिटी आराखडा तयार करणेबाबत सूचित केले आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई शहर स्मार्ट सिटी करण्याकरीता नवी मुंबईतील नागरिकांनी सेवासुविधांबाबतच्या आपल्या मौल्यवान सूचना नोंदविण्याकरीता महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली, मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2015 रोजी सकाळी 11 वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे नागरिकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी नवी मुंबईतील नागरिकांनी या विशेष नागरिक बैठकीप्रसंगी आवर्जुन उपस्थित रहावे व स्मार्ट सिटी बाबतच्या आपल्या मौल्यवान सूचना मांडाव्यात असे आवाहन महापौर श्री. सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.