मुंबई : परतीच्या पावसामुळे वातावरणात होणार्या सततच्या बदलाच्या परिणामाने मुंबई तापाने फणफणल्याचे दिसत आहे. सप्टेंबरमध्ये 12,170 तापाचे रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लूसोबत डेंग्यू, लेप्टो, मलेरिया व गॅस्ट्रोमुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तापाच्या रुग्णांचा हा आकडा ऑक्टोबरमध्ये वाढता राहणार असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केला.
जुलै व ऑगस्टमध्ये शहरांमध्ये साथीच्या आजाराने विशेषत: स्वाईन फ्लू व लेप्टोने थैमान घातले होते. पण काही दिवसांपासून पावसाने पूर्ण पाठ फिरवल्याने मुंबईत तापाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ऑगस्टमध्ये 2,790 तापाच्या रुग्णांवर विविध पालिका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सप्टेंबरमध्ये तापाच्या रुग्णांचा आकडा 12,170 वर पोहोचल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला धक्काच बसला. कारण, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, पुढील दुसर्या व तिसर्या आठवड्यात साथीच्या आजारांची रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
15 ते 21 सप्टेंबर या दुसर्या आठवड्यात तापाच्या 2,800 रुग्णांना पालिकेच्या विविध रुग्णालयात दाखल केले. तर तिसर्या आठवड्यात हा आकडा थेट 12,170 वर पोहोचला होता. त्याचप्रमाणे सप्टेंबरमध्ये गॅस्ट्रोचे 769 रुग्ण, मलेरिया 1,045, लेप्ट्रो 26, डेंग्यू 248, स्वाईन फ्लू 257 आणि टॉयफॉईडचे 159 रुग्ण आढळले.
** नऊ दिवसांत डेंग्यूमुळे मुंबईत दोघांचा मृत्यू
21 ते 30 सप्टेंबर या नऊ दिवसांत डेंग्यूमुळे मुंबईत दोघांचा मृत्यू झाला. कांदिवलीतील 50 वर्षीय महिलेला ताप आल्याने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत या महिलेला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर गोवंडीतील एका साडेतीन वर्षाच्या लहान मुलाचा केईएम रुग्णालयात डेंग्यूने मृत्यू झाला.
** रुग्णाला बरे होण्यासाठी लागणार वेळ
केईएम, नायर व सायन पालिकेच्या या रुग्णालयात सप्टेंबरमध्ये तापामुळे मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाले होते. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णापैकी 12-15 टक्के रुग्णांना डेंग्यू व मलेरिया असतो. डेंग्यूची लागण झालेले 45 टक्के रुग्ण 4-6 दिवसात बरे होतात. तर 39 टक्के रुग्णांना बरे होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो. रुग्ण उशीरा उपचारासाठी आल्याने आजार बळावतो. त्यामुळे या 15 टक्के रुग्णांना या आजारातून बरे होण्यासाठी 15 दिवस लागतात, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी म्हटले आहे.
** साथींच्या आजारांबाबत जागरूकता
साथींच्या आजारांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी रस्त्यावर, मंडईत, रुग्णालयात व सार्वजनिक गणेश मंडळात 1,15,200 पोस्टर्स लावली होती. गर्भवतींना स्वाईन फ्लूचा धोका अधिक असतो, यासाठी आतापर्यंत 915 गरोदर स्त्रियांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाकडून मिळाली.