नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई हे स्वच्छ शहर म्हणून देशात तृतीय क्रमांकाने मानांकीत असून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. हे मानांकन उंचावण्यासाठी महापालिकेसोबत सर्व घटकांचा एकत्रित सहभाग अपेक्षित असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून आपण देशात सर्वोत्तम स्वच्छ शहर म्हणून मानांकीत होऊ असा विश्वास व्यक्त करीत नवी मुंबईचे उपमहापौर श्री. अविनाश लाड यांनी प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपले घर, आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी जागरूकता दाखवावी, योगदान द्यावे यातून आपोआपच नवी मुंबई शहर स्वच्छ राहील असे आवाहन केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करण्यासाठी पामबीच मार्गावर महापालिका मुख्यालयापासून मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नागरिकांना स्वच्छता सहभागाचे आवाहन केले.
याप्रसंगी उपमहापौरांसह महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समितीच्या सभापती सौ. नेत्रा शिर्के, नगरसेविका उषा भोईर व तनुजा मढवी, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, स्था.सं.कर उपआयुक्त उमेश वाघ, शहर अभियंता मोहन डगांवकर, मुख्य लेखा वित्त अधिकारी धनराज गरड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान उपआयुक्त सौ. तृप्ती सांडभोर, इटीसी संचालक सौ. वर्षा भगत, कार्यकारी अभियंता संजय देसाई, अरविंद शिंदे व जसवंत मेस्त्री, सहा. आयुक्त दत्तात्रय नागरे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
उपमहापौरांसह सर्व उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ ग्रहण केली आणि उपमहापौर, आयुक्तांसह महापालिका पदाधिकारी, नागरसेवक, अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद, महापालिका व खाजगी शाळांतील विद्यार्थी आणि स्वच्छतेविषयी जागरूक नागरिक अशा दोन हजाराहून अधिक व्यक्तींनी पामबीच मार्गावर महापालिका मुख्यालयापासून नेरूळच्या दिशेने हातात हात गुंफून मानवी साखळीव्दारे ‘ चला, आपले नवी मुंबई शहर स्वच्छ ठेवूया, आणि त्याची सुरूवात स्वत:पासूनच करूया ’ असा स्वच्छतेचा संदेश प्रसारीत केला.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महात्मा गांधीजींनी दिलेली स्वच्छतेची शिकवण जनमानसात रूजविण्यासाठी स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छतेच्या कार्यात जनतेच्या सहभागाचे महत्व लक्षात घेऊन संपूर्ण नवी मुंबई शहरात विविध उपक्रम, पथनाट्य, होर्डींग, सोशल मिडीया अशी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात असल्याची माहिती दिली. मानवी साखळीव्दारे स्वच्छता संदेशाचा प्रसार हा त्याचाच एक भाग असून स्वच्छ शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळवायचेच या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना अभियानांतर्गत ११ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेतले जात असून नागरिकांनी अस्वच्छता तसेच अनधिकृत होर्डींगसारख्या गोष्टींमुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण टाळावे आणि आपले नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर व हरीत करण्यासाठी वैयक्तिक व सामुहिक पातळीवर प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबईचे देशातील तृतीय मानांकन उंचाविण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाहीला गतीमान सुरुवात झाली असून हागणदारीमुक्त शहर संकल्पना पुर्णत्वास आणण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना राबविल्या जात आहेत. ११ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून ४ ऑक्टोबर रोजी विभागाविभागात नागरिक पातळीवर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. ६ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी स्वच्छतेची शपथ दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे ११ ऑक्टोबरपर्यंत स्थानिक पातळीवर स्वच्छताविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शाळांतून विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करुन विद्यार्थ्यांच्या मनात माहिती-ज्ञान व कलेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश बिंबविण्यात येणार आहे. विभागीय स्तरावर आंतरसोसायटी स्वच्छता स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. या सर्व स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांना स्वच्छतेविषयी चांगली कामगिरी केल्याबद्दल पारितोषिके प्रदान करुन प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. या माध्यमातून स्वच्छ, सुंदर व हरित नवी मुंबईचा संदेश मोठ्या प्रमाणावर जनमानसात प्रसारीत केला जात आहे.