नवी दिल्ली : देशभरात 2009 ते 2013 या चार वर्षांमध्ये 11 अणू शास्त्रज्ञांचा गूढ मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती अणुऊर्जा विभागाच्या ताज्या आकडेवारीतून उघडकीस आली आहे.
अणूऊर्जा विभागाच्या प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या आठ शास्त्रज्ञ व अभियंत्यांचा स्फोटात, समुद्रात बुडून वा गळफास लावून मृत्यू झाला आहे. हरियाणा येथील राहुल सेहरावत यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत यासंदर्भात माहिती मागितली होती. त्यावर अणुऊर्जा विभागाने ही माहिती दिली आहे.
या कालावधीत अणुऊर्जा मंडळाच्या तीन अधिकार्यांचाही झालेला मृत्यू संशयास्पद आहे. त्यापैकी दोन अधिकार्यांनी आत्महत्या केल्या. तर एकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता.
रावतभाटा येथे एका तज्ज्ञाचा मृतदेह 2012 मध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळला होता. बार्कमधील एका प्रकरणाबाबत पोलिसांनी आजारपणाचे कारण दिले आहे. अणुऊर्जा विभागात कार्यरत तज्ज्ञाने प्रदीर्घ आजारपणाला कंटाळून गळफास लावून घेतल्याचे पोलिसांनी तपासाअंती सांगितल्याची माहिती अणुऊर्जा विभागाने दिली.
तर मुंबईत तुर्भे येथील भाभा अणू संशोधन केंद्रात (बीएआरसी) शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले एम. पद्मनाभन अय्यर (45) यांचा गळफास लावलेला मृतदेह त्यांच्या ब्रीच कॅण्डी परिसरातील राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. अय्यर यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात त्यांचा मृत्यू डोक्यात अवजड वस्तूने घाव घातल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
भाभा अणू संशोधन केंद्रातील रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये दोन संशोधन सहायकांचा अचानक लागलेल्या आगीत मृत्यू झाला होता. गळा आवळून त्यांचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र अद्यापही या प्रकरणाचा छडा लागलेला नाही.
आरआरसीएटीच्या ड श्रेणीच्या एका शास्त्रज्ञानेही कथितरीत्या आत्महत्या केली होती. यानंतर या प्रकरणाची फाईलही पोलिसांनी बंद केली. कल्पकममध्ये कार्यरत आणखी एका शास्त्रज्ञाने 2013 मध्ये कथितरीत्या समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. आणखी एका शास्त्रज्ञाने कथितरीत्या कर्नाटकच्या कारवारमध्ये काली नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. मात्र वैयक्तिक कारणांतून ही आत्महत्या केल्याचा पोलिसांनी दावा केला होता. तर रावतभाटामध्ये याच गटाचा अन्य एक शास्त्रज्ञ 2012 मध्ये त्याच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आला होता. बार्कच्या एका प्रकरणात दीर्घ आजारामुळे शास्त्रज्ञाने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांनी हे प्रकरण बंद केले. तर अन्य प्रकरणांचा अद्यापही तपास सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे याची विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी चेतन कोठारी यांनी अॅड. आशीष मेहता यांच्यामार्फत जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. यावर अणुशास्त्रज्ञांच्या आरोग्याची व सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जाते की नाही? याचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने राज्य शासनाला दिले होते. सदर याचिका अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे.