नवी मुंबई / प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक नेहमीच भेट देत असतात. महालेखाकार यांच्या पश्चिम विभागीय प्रशिक्षण संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजित महानगरपालिकांमधील पर्यावरण विषयक लेखा परीक्षण या राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. १६ ऑक्टोबर २०१५ रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पर्यावरण विषयक विविध उल्लेखनीय प्रकल्पांना महालेखाकार यांच्या अभ्यास समूहाने आज विशेष भेट दिली.
दि. १२ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरातील महालेखाकारांकरीता हा राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विषयक प्रकल्प व कामांची दखल घेत ही विशेष प्रकल्पस्थळ अभ्यास भेट यशदा या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेचे डीन भारत भूषण यांच्या नियोजनानुसार आयोजित करण्यात आली होती.
या भेटीमध्ये देशभरातील २७ महालेखाकार, लेखा परीक्षकांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे ग्रीन बिल्डींग गोल्ड मानांकित मुख्यालय इमारत, अत्याधुनिक सी-टेक तंत्रज्ञानावर आधारीत पर्यावरणशील मलप्रक्रिया केंद्र नेरुळ, शास्त्रोक्त जमीन भरणा पध्दतीवर आधारीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तुर्भे, जुनी क्षेपणभूमी शास्त्रोक्तरीत्या बंद करुन त्याठिकाणी फुलविलेले निसर्गोद्यान कोपरखैरणे अशा पर्यावरण पुरक प्रकल्पस्थळांना तसेच इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रासारख्या लोककल्याणकारी उपक्रमाला भेटी देऊन ही अभ्यासभेट माहिती व ज्ञानात भर घालणारी तसेच प्रभावीत करणारी असल्याचे मत व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुविधा प्रकल्पांची दखल संपूर्ण देशभरातल्या कामांचे परीक्षण करणार्या महालेखाकारांनी घेणे ही नवी मुंबई महानगरपालिकेसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले.
दिनांक १२ ते १७ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत महालेखाकारांचा हा राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न होत असून या महालेखाकार समुहामध्ये वरिष्ठ उप महालेखाकार कृष्णमुर्ती संकर व तापसकुमार सेन, उपमहालेखाकार आर. श्रीधर, श्रीम. यशोदा, दत्तप्रसाद शिरसाट, शिवराज धुपे, वरिष्ठ लेखा परीक्षक सर्वश्री एन. रविंद्र, आर. रामचंद्रन, बाबाजी प्रधान, एन. रामास्वामी, श्रीम. सुनिता भट्टाचार्य, निरजकुमार सिन्हा, श्रीम. जयश्री चेट्टीयार, लेखा परीक्षक सर्वश्री सुब्रतकुमार नायक, पी. विश्नाथन, हितेश काकोती, सुनिल गायकवाड, सहा. लेखा परीक्षक सर्वश्री बी. दुर्गा नागेश्वरराव, जयदेब भौमीक, अभिषेककुमार सिन्हा, विजयकुमार गौरव, कुंजबिहारी पंडीत, ग्यानप्रकाश, मेघन पासवान, वरीष्ठ लेखा अधिकारी श्रीम. विना बालिगा आदी देशभरातील विविध राज्यांचे महालेखाकार व लेखा परीक्षक सहभागी होते.
महापौर सुधाकर सोनवणे यांची या महालेखाकार समुहाने सदिच्छा भेट घेऊन नवी मुंबई हे प्रभावीत करणारे शहर असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शहर अभियंता मोहन डगांवकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, मुख्य लेखा परीक्षक डॉ. सुहास शिंदे, एल.बी.टी. विभागाचे उपआयुक्त उमेश वाघ, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, सह शहर अभियंता जी.व्ही.राव, इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र संचालिका डॉ. वर्षा भगत आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
या भेटीत त्यांनी महानगरपालिकेचे प्रकल्प शहरासाठी लाभदायक असल्याचे मत व्यक्त करीत याचे अनुकरण इतर शहरांनीही करावे असा अभिप्राय दिला. पर्यावरण जपण्याचा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवून महानगरपालिका नागरी सुविधा पुरवित असून पर्यावरण रक्षण, संवर्धनाबरोबरच यामधून अप्रत्यक्षपणे नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. इ.टी.सी. केंद्रासारखा उपक्रम राबवून निसर्गाने अन्याय केलेल्या मुलांकरीता मदतीचा हात देण्याची महानगरपालिकेची भूमिका प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
इको-सिटी म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेची वाटचाल सुरु असताना आता स्मार्ट सिटी करीता निवडलेल्या राज्यातील १० शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा समावेश असून तसेच देशातील स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचे नामांकन प्राप्त झालेले असताना महानगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरणपुरक प्रकल्पांची दखल पर्यावरण तज्ज्ञ व अभ्यासक यांच्यामार्फत नेहमीच घेतली जात असते. तसेच या कामांसाठी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार महानगरपालिकेस प्राप्त होत असताना महालेखाकारांच्या राष्ट्रीय समुहाने अभ्यास म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पांना भेटी देणे व समाधान व्यक्त करणे ही नवी मुंबई महानगरपालिकेसाठी सन्मानाची बाब असल्याचे मत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले आहे.