राजकोट : सलामीवीर रोहित शर्मासह (65) विराट कोहली (77) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (47) दमदार फलंदाजीनंतरही भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या वनडेत रविवारी 18 धावांनी पराभूत व्हावे लागले.
सलामीवीर क्विंटन डी कॉकचे (103) शतक आणि वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलची (4 विकेट) प्रभावी गोलंदाजी पाहुण्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. राजकोटवरील विजयासह पाच लढतींच्या मालिकेत द. आफ्रिकेने 2-1 अशी आघाडी घेतली.
आघाडी फळीच्या सातत्यामुळे 40व्या षटकापर्यंत भारताच्या विजयाच्या आशा कायम होत्या. शेवटच्या 10 षटकांत जिंकण्यासाठी 86 धावा आवश्यक असल्याने रनरेट प्रति षटकामागे नऊ धावा इतका झाला. झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात धोनी आणि कोहलीवर दडपण आले. मोठे फटके लगावण्याच्या नादात दोघेही बाद झाले. विराटच्या 34व्या अर्धशतकात पाच चौकारांचा समावेश आहे.
धोनीनेही तितकेच चौकार लगावले. या जोडीनंतर सुरेश रैना आणि अजिंक्य रहाणेच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले. मात्र रैनाने (0) पुन्हा एकदा निराशा केली. कोहली आणि धोनीनंतर सहाव्या क्रमांकावर खेळणार्या अजिंक्यला (4) लवकर बाद करताना वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलने भारताला आणखी पिछाडीवर नेले. 30 चेंडूंत 55 धावा हव्या असताना हरभजन सिंग (नाबाद 15) आणि अक्षर पटेलने (नाबाद 20) सातव्या विकेटसाठी 20 चेंडूंत नाबाद 36 धावा जोडल्या तरी विजयासाठी 18 धावा कमी पडल्या.
272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने शिखर धवनसह भारताला सावध सुरुवात करून दिली. डावखुरा सलामीवीर धवन (13) पुन्हा एकदा लवकर बाद झाला. त्याला 12 धावांवर डेविलियर्सने जीवदान दिले होते. मात्र जीवदानाचा फायदा उठवण्यात धवनला अपयश आले. धवन बाद झाल्यानंतर रोहितने विराट कोहलीसह दुसर्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी करताना भारताला सावरले. धवनप्रमाणे रोहितलाही (18 धावांवर) जीवदान मिळाले होते. त्यापूर्वी धावचीत होता-होता वाचला. मात्र त्यातून धडा घेत रोहितने 27वे अर्धशतक ठोकले. त्याच्या 74 चेंडूंतील 65 धावांच्या खेळीत 7 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. रोहित बाद झाल्यानंतर कोहलीने धोनीसह तिसर्या विकेटसाठी 80 धावा जोडताना आव्हान कायम ठेवले. यजमानांतर्फे नोंदवली गेलेली ती सर्वाधिक भागीदारी ठरली. कोहली-धोनीने तब्बल 19 षटके किल्ला लढवला तरी शिल्लक चेंडू आणि आवश्यक धावा यांच्यातील अंतरही वाढत गेले.
तत्पूर्वी, डावखुरा सलामीवीर क्विंटन डी कॉकचे (118 चेंडूंत 103 धावा) सातवे शतक आणि फाफ डु प्लेसिसच्या (63 चेंडूंत 60 धावा) फटकेबाजीनंतरही प्रतिस्पध्र्याना 7 बाद 270 धावांत रोखण्यात भारताला यश आले. दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीच्या क्रमातील बदल रविवारीही कायम ठेवले. कॉकने डेव्हिड मिलरसह (33) झटपट 72 धावांची सलामी दिली. ऑफस्पिनर हरभजन सिंगने जोडी फोडली. त्यानंतर वनडाउन हशिम अमलाला (5) लवकर बाद करण्यात अमित मिश्राला यश आले. मात्र कॉक आणि फाफ डु प्लेसिस जोडी जमली. या जोडीने तिसर्या विकेटसाठी 121 चेंडूंत 118 धावांची भागीदारी करताना संघाला सुस्थितीत आणले.
प्लेसिसने 19वे अर्धशतक झळकावताना 63 चेंडूंत 6 चौकारांसह 60 धावा केल्या. कॉकने 118 चेंडूंत शानदार 113 धावांची खेळी केली. त्यात 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. स्थिरावलेली ही जोडी सात चेंडूंच्या फरकाने पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर पाहुण्यांच्या धावसंख्येला खीळ बसली. कर्णधार एबी डेविलियर्स (4) आणि जेपी दुमिनीला (14) झटपट माघारी परतावे लागल्यानंतर द. आफ्रिकेची अवस्था 3 बाद 210 वरून 5 बाद 210 धावा अशी झाली.
कॉक-प्लेसिसच्या फटकेबाजीमुळे पाहुणे तीनशेपार मजल मारतील, असे वाटले. मात्र तीन विकेट झटपट पडल्यामुळे शेवटच्या 10 षटकांत त्यांना दोन विकेटच्या बदल्यात 60 धावा जमवता आल्या. फरहान बेहार्डियनने (36 चेंडूंत 33 धावा) थोडा तग धरल्याने द. आफ्रिकेला पावणेतीनशेच्या घरात पोहोचता आले. भारतातर्फे मध्यमगती गोलंदाज मोहित शर्माने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या तरी त्याने 9 षटकांत 62 धावा मोजल्या. लेगस्पिनर अमित मिश्राने (10-0-38-1) मात्र अचूक मारा केला. स्लॉग ओव्हर्समध्ये सर्वच गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. भारताचे क्षेत्ररक्षणही चांगले झाले. पाहुण्यांचे दोन फलंदाज धावचीत झाले. अजिंक्य रहाणेने मिलरचा टिपलेला झेल अप्रतिम होता.