मुंबई : छोटा राजनला इंडोनेशियात झालेली अटक ही निव्वळ सेटिंग असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम.एन.सिंग यांनी केला आहे. राजनची उपयुक्तता संपली आहे, त्यातच अनेक आजारांनी त्रस्त असलेला राजन भारतातल्या तुरुंगात जास्त सुरक्षित राहील, त्यामुळेच राजनने स्वत:ला अटक करवून स्वतःला सुरक्षित करुन घेतल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सिंग म्हणाले.
छोटा राजनला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्याची गरज आहे. राजन गँग आता पूर्वीसारखी राहिलेली नाही, ती कमजोर झालेली आहे. खुद्द छोटा राजनही आजारी आहे. मात्र तो अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. त्यामुळे त्याची चौकशी करणं आवश्यक आहे. राजनला पकडून आणल्याने इतर गँग्जवर दहशत बसेल असं एम. एन. सिंग म्हणाले.
राजनचा वापर करुन यंत्रणा दाऊदला पकडण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तो हाती लागत नसल्याने राजनला अटक केल्याचं सिंग म्हणाले. म्हातारा झाल्यामुळे त्याने भारतात जेलमध्ये सुरक्षित राहण्याचा विचार केला असावा, असंही सिंग यांनी म्हटलं आहे. राजनला भारतात आणायला हवं, आणि त्याच्या हस्तांतरणात कुठली अडचण येईल असं वाटत नसल्याचंही ते म्हणाले.
अंडरवर्ल्ड विश्वातील मोस्ट वॉंटेड गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजनला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. इंडोनेशियातील बाली इथं छोटा राजनला पकडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर इंटरपोलने छोटा राजनला पकडल्याचा फोटो इंडोनेशियातून जारी प्रसिद्ध केला आहे.
मुंबई आणि भारतातील अनेक गँगवॉरमध्ये छोटा राजनचा हात आहे. गेल्या अनेक दशकांपासून तो फरार होता. अनेक दिवसांपासून मुंबई पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. मात्र त्याला ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या माहितीवरून इंडोनेशिन पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
५५ वर्षीय छोटा राजन १९८६ पासून फरार आहे. गेल्या दोन दशकांपासून इंटरपोल त्याचा कसून शोध घेत होते. अखेर त्याला १९९५ मध्ये ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हणून घोषीत केलं होतं.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एकेकाळचा उजवा हात म्हणून छोटा राजनला ओळखलं जात होतं. मात्र त्यांच्यात वाद झाल्यानंतर दाऊद आणि छोटा राजन वेगळे झाले होते. मुंबईतील १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी स्फोटानंतर तर दाऊद आणि राजन यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. हा स्फोट दाऊदने घडवल्याचा आरोप आहे.
हा स्फोट घडवणार्या आरोपींची हत्या केल्याचा आरोप छोटा राजनवर आहे. तसंच ज्येष्ठ पत्रकार ज्योतीर्मय डे उर्फ जे डे यांच्या हत्येमागेही छोटा राजनचा हात असल्याचा आरोप आहे.