संदीप खांडगेपाटील
नवी मुंबई : महाराष्ट्राच्यामहामंडळ नियुक्त्याचे वारे जोरदार वाहू लागले असून त्याचे पडसाद नवी मुंबईतही उमटू लागले आहेत. नवी मुंबई शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखेंना सिडको संचालकपद मिळण्याची दाट शक्यता स्थानिक शिवसैनिकांकडून व्यक्त केली जावू लागली आहे. शिवसेनेत गेल्या अनेक वर्षापासून संघटनेच्या मुख्य प्रवाहात तसेच शिवसेना संघटनेचया विविध सेलमध्ये सक्रिय योगदान देणार्या ऍड. मनोहर गायखेंच्या कार्याची दखल महामंडळ नियुक्त्यांमध्ये नक्कीच घेतला जाणार असल्याचा आशावाद शिवसैनिकांकडून व्यक्त केला जावू लागला आहे.
राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणूका जवळ आल्यावर हमखासपणे प्रत्येकवेळी ऍड. मनोहर गायखेंच्या नावाची चर्चा जोरदारपणे होते. अंतिम टप्प्यातही त्यांचेच नाव आघाडीवर असल्याची चर्चा सेना वर्तुळात असते. पण मोक्याच्या क्षणी दुसर्याच कोणाच्या तरी भाळी तिलक लावण्यात येवून ऍड. गायखेंच्या पदरी निराशा पडते. असा प्रकार अनेकदा घडला आहे. ऑक्टोबर २०१४च्या विधानसभा निवडणूकीतही बेलापुर विधानसभा मतदारसंघातून ऍड. गायखेंच्या उमेदवारीची जोरदार चर्चा होती. पण पक्षनेतृत्वाने संघटनेत काही वर्षापूर्वीच सक्रिय झालेल्या उपनेते विजय नाटहांना उमेदवारी देवून जुन्या जाणत्या ऍड. मनोहर गायखेंवर पुन्हा एकवार अन्याय केला.
नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद महापालिका निवडणूकीअगोदरपासून रिक्त आहे. जिल्हाप्रमुख पदाबाबतच्या चर्चेतही उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखेंचे नाव आघाडीवर असले तरी पक्षनेतृत्वाकडून गेल्या आठ-नऊ महिन्यापासून जिल्हाप्रमुख नियुक्त करण्याविषयी आजतागायत उदासिनताच दाखविण्यात आलेली आहे. ऍड. गायखे हे शिवसैनिक, शिवसेना विभागप्रमुखपदापासून शिवसेना उपजिल्हाप्रमुखापर्यत संघटनात्मक वाटचाल करत आले आहेत. याशिवाय शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्ष, विमा कर्मचारी सेना, वितरक सेना यासह अन्य सेलवर गायखेंनी प्रभावीपणे काम करत जिल्हा संपर्कप्रमुखपदाचा कार्यभार सांभाळलेला आहे.
महामंडळ नियुक्त्यांचे वारे राज्यात वाहू लागल्याने नवी मुंबईतील इच्छूकांच्या आशा पल्ल्वित झाल्या आहेत. सिडको संचालकपद देताना ऍड. गायखेंच्या संघटनात्मक कामाचा विचार प्राधान्याने केला जाणार असल्याची चर्चा शिवसेना वर्तुळात जोर धरू लागली आहे. संघटनेत बाहेरून आलेल्या घटकांना चुचकारतांना ऍड. गायखेंसारख्या निष्ठावंतांवर अनेकदा अन्याय झाला आहे. किमान सिडको संचालकपदी वर्णी लावताना ऍड. मनोहर गायखेंसारख्या जुन्या जाणत्या स्थानिक नेतृत्वाचा प्राधान्याने विचार करण्याची मागणी शिवसैनिकांमध्ये जोर धरू लागली आहे.