* वाशी रेल्वे स्थानक ते महापालिका मुख्यालयादरम्यान बससेवेची मागणी
* शिवसेना नगरसेविका व विधी समिती सदस्या सौ. सुनिता रतन मांडवेंचा पुढाकार
नवी मुंबई : महापालिका कर्मचार्यांकरता वाशी रेल्वे स्थानक ते महापालिका मुख्यालयादरम्यान सकाळ-संध्याकाळ स्वतंत्र बससेवा उपलब्ध करून देणेबाबतचे लेखी निवेदन शिवसेनेच्या नगरसेविका व विधी समिती सदस्या सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त व विरोधी पक्षनेत्यांना आज सादर केले.
नवी मुंबई महापालिका मुख्यालय पामबीच मार्गालगत असून सीवूड्स व बेलापुर रेल्वे स्थानकादरम्यान हे मुख्यालय येत आहे. रेल्वे स्थानकापासून हे मुख्यालय पायी चालत ये-जा करण्याईतके समीप नसल्याने महापालिका कर्मचार्यांना व अधिकार्यांना रेल्वे स्थानकापासून महापालिका मुख्यालयापर्यत येण्याकरता रिक्षा वा एनएमएमटीच्या बसेसचा वापर करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने कर्मचारी व अधिकार्यांची होत असलेली प्रवासाची गैरसोय लक्षात घेता सकाळ व संध्याकाळ या दोन वेळा कार्यालयीन वेळ लक्षात घेवून महापालिका प्रशासनाच्या परिवहन उपक्रमाची स्वतंत्र बससेवा तात्काळ उपलब्ध करून देणे असल्याचे शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
समस्येचे गांभीर्य व कर्मचारी-अधिकार्यांच्या प्रवासाची होत असलेली गैरसोय या दोन गोष्टींचा प्राधान्याने विचार करत आपण आमच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि शक्य तितक्या लवकर महापालिका कर्मचारी-अधिकार्यांकरता वाशी रेल्वे स्थानक ते महापालिका मुख्यालयादरम्यान एनएमएमटीची बससेवा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याकरता महापालिका प्रशासनाला सूचना करावी अशी मागणी शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी निवेदनातून केली आहे.