नवी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज प्रादेशिक व राष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये बातम्यांची जागा घेवून मिरवित आहे. मनसेचा राज्यभरातील संघटनात्मक आढावा घ्यावयाचा झाल्यास ‘आंदोलनात्मक लढवय्या मनसे’ फक्त नवी मुंबई कार्यक्षेत्रातच पहावयास मिळेल. मनसेसुप्रिमो राज ठाकरेंनी कोणताही विषय अथवा मुद्दा हाती घ्यायचा आणि त्यावर कोणी खिंड लढवू अथवा न लढवू, नवी मुंबई मनसे मात्र त्याप्रकरणी आक्रमकता दाखविणारच हा विश्वास आता एव्हाना राज ठाकरेंच्या मनामध्ये निर्माण झाला असणार. अर्थात हे चित्र काही सहजासहजी अथवा विनासायास निर्माण झालेले नाही. त्यासाठी मनसेच्या स्थानिक नेतेमंडळींना व कार्यकर्त्यांना परिश्रमाची शिकस्त करावी लागली आहे. मनसे स्थापनेपासून नवी मुंबईत मनसे कार्यरत आहे. मनसेचा संघटनात्मक अभ्यास करावयाचा झाल्यास सुरूवातीच्या काळात नवी मुंबई कार्यक्षेत्राकडेे राज ठाकरे व त्यांच्या बिन्नीच्या शिलेदारांनी या भागाकडे कानाडोळाच केलेला होता. नियतीचा योगायोग तरी पाहा, ज्या नवी मुंबईतील मनसे संघटनेकडे सुरूवातीच्या काळात दुर्लक्ष करण्यात आले होते, तीच नवी मुंबईतील मनसे आज नवी मुंबई नाही तर मंत्रालय दणाणून सोडत आहे. मनसेचे नवी मुंबईतील शिलेदार नवी मुंबईची खाडी ओलांडून खाडीपलिकडच्या पोलीस ठाण्यांनादेखील आपल्या नावाची कागदोपत्री दखल घेणे भाग पाडत आहे. पूर्वीची नवी मुंबईतील मनसे आणि आजची मनसे यातील तफावत म्हणजे नापीक जमिनीने नंदनवनाच्या दिशेने सुरू झालेली आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. नवी मुंबई शहराची निर्मिती शासकीय गरजेपोटी झालेली असली तरी या शहराला मोर्चे, आंदोलने याची अलिकडच्या काळात फारशी सवय नव्हती. पूर्वी प्रकल्पग्रस्तांचे मोर्चे, १४ गावाचे मोर्चे याचा अपवाद वगळता नवी मुंबईत लढवय्ये आंदोलनांचा दुष्काळच होता. पण नियतीला हे चित्र पहावले नाही. गजानन काळे नावाचा अवलिया या नवी मुंबईत वास्तव्याला आला आणि नवी मुंबई शहराला एक आंदोलनात्मक चेहरा पहावयास मिळाला. समाजपरिवर्तनाचे ध्येय उराशी बाळगून काही जण पछाडल्याप्रमाणे कार्य करतात. त्याच पठडीत काही अंशी मोडणारा गजाजन काळेनामक एक धडपड्या युवक. चळवळीचा बाणा श्वासाश्वासात मुरलेले गजाजन काळे आंदोलनाच्या मुशीतच लहानाचे मोठे झाले आहेत. रूळलेल्या वाटेवरून सर्रासपणे वाटचाल अनेकजण करतात, पण वेगळ्या वाटेवरून चालणारे ईतिहास तर घडवितात, नव्हे तर इतिहासालाही आपली दखल घेणे भाग पाडतात. गजानन काळे नावाचा सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा अतृप्त आत्मा जनआंदोलनापासून व चळवळीपासून फार काळ अलिप्त राहणे शक्यच नाही, किंबहूना सटवाईने गजाननाच्या कपाळावर पाचवीच्या दिवशी तसे लिखाणच केले असावे. मनसेकडे सुरूवातीच्या काळात राज ठाकरेंच्या आकर्षणामुळे मोठ्या प्रमाणावर जनसागर महाराष्ट्रातून उसळला होता. नवी मुंबईची मातीही त्याला अपवाद नव्हती. पण नवी मुंबईची मनसे गटातटात विखुरली गेल्याने व पक्षापेक्षा स्वत:ला मोठी समजणारी माणसे मनसेच्या छावणीत सक्रिय असल्याने मनसेची वाढलेली ताकद ही सुज असल्याचे यथावकाश स्पष्ट झाले. माणसे ज्या ओघाने आली, त्या ओघाने निघूनही गेली. मनसेच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई शहरअध्यक्षपदाची धुरा गजानन काळे यांच्याकडे राज ठाकरेंनी सोपविली. अर्थात ते पद त्यांना सहजासहजी मिळालेले नाही. त्यांची क्षमता पाहूनच त्यांच्याकडे हे पद सोपविण्यात आले. नवी मुंबईची विद्यार्थी संघटना सांभाळताना त्यांनी केलेली आंदोलने व मनविसेला दिलेला आक्रमक चेहरा राज ठाकरे यांनी जवळून पाहिलेला आहे. टोलनाक्यावरील आंदोलनाचा महाराष्ट्रभर फुसका बार निघत असताना व नवी मुंबईतील अधिकांश मनसेचे शिलेदार पोलिस ठाण्यात ‘ओम स्वाहा’ झालेले असताना केवळ गजानन काळेंनी पामबीच मार्गावर ‘आगरी-कोळी भवना’नजीक ‘रास्ता रोको’ आंदोलन यशस्वी केले होते. पोलिसांनी केलेली त्यांना अमानुष मारहाण याचा मीदेखील एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होतो. गजानन काळेंनी ‘तो आला, त्याने पाहिजे व त्याने जिंकले’ अशीच नवी मुंबई मनसेच्या संघटनेत वाटचाल केलेली आहे. आंदोलनाचे व्यसन गजानन काळेंनी मनसैनिकांना लावले आहे. नागरी समस्या निवारणासाठी महापालिकेच्या विभाग अधिकारी कार्यालयावर मोर्चे, तुरडाळीसाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच मनी ऑर्डर करण्याचे अभिनव आंदोलन, थाळीनाद, एपीएमसीतील डाळ धाड प्रकरण, इंग्रजाळलेल्या मदमस्त शालेय व्यवस्थापणाला गणेशोत्सवाची रजा देणे भाग पाडणे अशी शेकडो उदाहरणे गजानन काळेंच्या चळवळ्या प्रवृत्तीमुळे शक्य झालेली आहे. मंत्रालयात जावून थेट गिरीश बापटांच्या दालनात जावून आंदोलन करणे, मंत्रालयीन सुरक्षा व्यवस्थेला थांगपत्ता लागू न देणे हे कोणा सोम्या गोम्याला जमणार नाही. अर्थात हे गजाजन काळेंना नवीन नाही. मागेही विद्यार्थी प्रवाहात वावरताना मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यात घुसण्याचे धाडस याच गजानन काळेंनी दाखविले होते. आंदोलनामध्ये आक्रमक असणार्या गजानन काळेंना आगामी काळात नवी मुंबई कार्यक्षेत्राचा विचार करता प्रभागाप्रभागात संघटना जनताभिमुख करण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. आंदोलने होतात, प्रसिध्दी मिळते, चार-दोन महिन्याने लोकांना आंदोलनाचा विसरही पडतो. विसर पडत नाही तो आंदोलनकर्त्या नेत्याला व त्यांच्या सहकार्यांना. कारण पोलिसांच्या काठीचे वळ त्यांच्या पाठीवर, हातापायावर उमटलेले असतात. पोलिस ठाण्यात पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. न्यायालयात चकरा माराव्या लागतात. बाहेरच्या लोकांना आतल्या लोकांना सोडविण्यासाठी जामिनदारांची शोधाशोध करावी लागते. अशावेळी आंदोलनात सहभागी नसलेली पक्षातील पांढरपेशी मंडळी जामिन देण्यासाठी कानाडोळा करतात, चालढकल करतात ही तर त्याहून अधिक संतापजनक बाब असते. नवी मुंबई मनसे वलंयाकिंत असली तरी जनाधाराच्याबाबतीत कोसो मैल मागे आहे याबाबतही गजानन काळेंना आत्मपरिक्षण करावे लागणार. २०१९च्या विधानसभेची तयारी करताना नवी मुंबईच्या मातीत मनसेची पाळेमुळे जनाधाराच्या बाबतीत खोलवर घुसणे गरजेचे आहे. आंदोलने व जनाधार याचा मिलाफ झाल्यास नवी मुंबईच्या राजकारणात गजानन काळेंचा अश्व रोखणे भल्याभल्यांना शक्य होणार नाही.