नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या मासे विक्री करणार्या आगरी-कोळी समाजातील घटकांना मार्केट व अन्यत्र जागा मिळण्याच्या प्रक्रियेस आक्षेप घेत नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते व नवी मुंबई लाईव्ह या वेबमिडीयाचे संपादक संदीप खांडगेपाटील यांनीप्रक्रिया स्थगित करून जनजागृती करून पुनश्च प्रक्रिया राबविण्याची मागणी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकार्यांकडे आज एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात विक्री मच्छि मार्केट व अन्यत्र मासे विक्री करणार्या आगरी कोळी समाजातील घटकांना मार्केट व अन्यत्र ओटेच्या माध्यमातून त्यांना जागा देण्याची प्रक्रिया नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सुरू झालेली आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने २२ नोव्हेंबरच्या लोकमत दैनिकामध्ये व २३ नोव्हेंबरच्या सकाळ दैनिकामध्ये मोठ्या स्वरूपात विस्तृतपणे जाहीरात दिली होती. आज (दि. ५ डिसेंबर) आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख असून माझा आक्षेप मार्केटमधील जागेला अथवा ओटे प्रक्रियेला नसून या प्रक्रियेपासून मासेविक्री करणारा आगरी-कोळी समाज आजही अनभिज्ञ आहे. त्याला आक्षेप आहे. वर्तमानपत्रात लाखो रूपयांच्या जाहीराती देण्यापेक्षा महापालिका प्रशासनाने मच्छिमार्केट, कोळी वाडे अथवा गावागावात त्याच पैशातून जनजागृती केली असती तर आज महापालिका प्रशासनाची ही प्रक्रिया मासे विक्रीशी संबंधित आगरी-कोळी समाजाला माहिती पडली असती व त्यांना या प्रक्रियेत सहभागी होणे सहज शक्य झाले असते, असे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
नेरूळ विभाग कार्यालय क्षेत्रात नेरूळ, सारसोळे, शिरवणे, जुई, दारावे व सभोवतालच्या गाव-गावठाणाचा समावेश होत आहे. या गावातील अधिकांश आगरी-कोळी समाजाची उपजिविका ही खाडीतील मासेमारीवर व मासेविक्रीवर अवलंबून आहे. खाडीत जावून मासेमारी करणे व पकडलेले मासे मार्केटमध्ये अथवा पदपथावर तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घरोघरी जावून विक्री करणे हाच येथील मासेमारीशी संबंधित आगरी-कोळी समाजाचा जीवनपट आहे. मासेमारी करण्यात व मासे विक्री करण्यात येथील आगरी-कोळी समुदाय व्यस्त असल्याने ज्यावेळी महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाकडून सर्व्हे झाला असेल त्यावेळी जर संबंधित मंडळी खाडीत मासेमारीला गेली असतील अथवा गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घरोघरी मासेविक्रीत व्यस्त असतील अथवा काही कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेली असतील तर मनपा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेला निश्चितच मर्यादा पडतात. आज या जाहीरातीविषयी अथवा हरकती घेण्याबाबतही किमान ९० टक्केपेक्षा अधिक संबंधित ग्रामस्थांना काडीमात्र कल्पना नाही. जे मासेमारी करतात अथवा घरोघरी जावून तसेच पदपथावर मासेविक्री करतात, त्यांची तर मनपा प्रशासनदरबारी नोंदही नसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मासेविक्री करणार्या घटकांना मार्केट व ओटे देण्याची प्रक्रिया काही काळापुरती स्थगित करावी. मनपा प्रशासन राबवित असलेल्या या उपक्रमाविषयी मच्छिमार्केट, गावागावातील कोळीवाडे, गावातील ग्रामस्थांच्या सामूहिक बैठका याबाबत जनजागृती करून त्यांना याबाबत माहिती करून देणे गरजेचे आहे. मासेमारी व मासेमारी करणार्या आगरी-कोळी समाजाला अंधारात ठेवून ही प्रक्रिया राबविणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या व्यसायात खरोखरीच सक्रिय असणार्या आगरी-कोळी जनसमुदायाला फायदा न मिळता संबंधित नसलेलेच घटक या योजनेचा फायदा उचलण्याची दाट शक्यता असल्याची भीती संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
आपल्या म्हणण्याचे गांभीर्य, पोटतिडीक, कळकळ, तथ्यता, सत्यता लक्षात घेवून योजनेची खरोखरीच प्रभावीपणे अंमलबजावणी करायची असेल तर ही प्रक्रिया काही दिवस स्थगित करून मासेमारी व मासेविक्री करणार्या सर्व घटकांना जनजागृतीच्या माध्यमातून विश्वासात घेवून व्यापक स्वरूपात राबवावी. महापालिका प्रशासनाचा याकामी सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे. महापालिका प्रशासनाने आमच्या म्हणणे विचारात न घेता प्रक्रिया राबविली तर महापालिका प्रशासनाच्या विरोधात आम्हाला नवी मुंबईच्या मासेविक्रीशी संबंधित आगरी-कोळी ग्रामस्थांसमवेत नाईलाजास्तव जनआंदोलन करावे लागेल अथवा न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील आपण याची नोंद घ्यावी असा इशारा संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून दिला आहे.